आज सकाळी 11 वाजता प्रतीक्षित असा केंद्रीय अर्थसंकल्प अरूण जेटली सादर करणार असून जेटली हे हिंदीमधून बोलतील अशी चर्चा आहे. तसे झाले तर बजेट हिंदीमधून सादर करणारे अरूण जेटली हे भारताचे पहिले अर्थमंत्री ठरणार आहेत. आत्तापर्यंत सादर झालेले सगळे केंद्रीय अर्थसंकल्प इंग्रजीतून मांडण्यात आले होते. देशभरातील बहुसंख्य राज्यांमधील ग्रामीण भागातील जनतेशी थेट संवाद व्हावा यासाठी जेटली हिंदीतून बोलणार असल्याची चर्चा आहे.

मंदावलेली अर्थव्यवस्था, वित्तीय तुटीचा सामना, ग्रामीण भागात असलेली नाराजी आणि कृषी क्षेत्राची परवड अशा अनेक समस्या देशाला घेरलेल्या असून जेटली कुणाचं किती समाधान करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. हे बजेट ग्रामीण भारताला सुखावणारं असेल असा अंदाज आहे. आठ राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. तसेच वर्षभरानं लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे संपूर्ण असं हे शेवटचं बजेट असेल. त्यामुळेच हे बजेट ग्रामीण भारतासाठी असेल असं बोललं जातंय. त्यामुळेच ग्रामीण भारताला ते नीट समजावं, त्यांच्या अर्थमंत्र्यांचा थेट संवाद व्हावा यासाठी अर्थसंकल्प हिंदीतून मांडण्यात येईल आणि आत्तापर्यंतचा इंग्रजीतून बजेट मांडण्याचा पायंडा जेटली मोडतील असं मानलं जात आहे.

दरम्यान जयंत सिन्हा यांनी हे बजेट राजकीय बजेट असल्याचं सूतोवात केलं आहे. त्यामुळे निवडणुका आणि लोकांच्या भावना यांचा विचार करून थोडा लोकानुनय करणारं बजेट असेल आणि आर्थिक प्राधान्यक्रम बाजुले ठेवले जातील अशी शक्यता आहे. कृषी क्षेत्राला कर्जमाफी, गरीबांसाठी अनुदानांच्या घोषणा आदी गोष्टी त्यामुळे या अर्थसंकल्पात बघायला मिळू शकतात.

सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर व्हायला सुरूवात होणार आहे. अर्थमंत्र्यांचा लाइव्ह इंटरव्ह्यू 2 वाजता आहे, अरूण जेटली 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत तर संध्याकाळी 7 वाजता आस्क युवर एफएम हा टॉकॅथॉन कार्यक्रम होणार आहे.