Budget 2018 केंद्र सरकारकडून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी भांडवली बाजाराने उसळी घेतली. आज भांडवली बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांक अनुक्रमे १५० आणि ५० अंकांनी वधारले. त्यामुळे सेन्सेक्स ३६,१२७.२० च्या पातळीवर जाऊन पोहोचला तर निफ्टीने ११,६०७.२५ ची पातळी गाठली. मात्र, आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भांडवली बाजाराचा मूड कसा असेल, हेदेखील पाहणे महत्त्वाच ठरेल.

दरम्यान, आशियाई शेअर बाजारांमध्येही तेजीची लाट दिसून आली आहे. जपान, तैवान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया या पूर्वेकडील देशांमधील शेअर बाजार सकाळी उघडल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्याप्रमाणावर समभागांची खरेदी केली. तब्बल एक आठवडा घसरत असलेला जपानचा निक्केई हा निर्देशांक गुरुवारी काही प्रमाणात वधारला. आशियाई बाजारातील या तेजीमुळेही काही प्रमाणात भारतीय शेअर बाजारात उत्साह निर्माण झाल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

यापूर्वी नोटाबंदी आणि ‘जीएसटी’ या नवीन अप्रत्यक्ष करप्रणालीनंतर औद्योगिक क्षेत्राची गती रेंगाळली असतानाही, देशाचा विकास दर सात टक्क्यांपल्याड झेप घेईल, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या आर्थिक सर्वेक्षणाच्या आशावादाने होताना गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. त्यावेळी दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये सप्ताहारंभी शुक्रवारच्या तुलनेत अर्ध्या टक्क्याची वाढ नोंदविल्यानंतर सेन्सेक्स तसेच निफ्टी त्याच्या नव्या उच्चांकावर विराजमान झाले होते. मात्र, काल गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचे धोरण कायम ठेवल्याने शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३६ हजारांच्या टप्प्यापासून दुरावला होता. मात्र, आज पहिल्याच सत्रात बाजाराने ही उणीव भरुन काढली.