भांडवली लाभावरील करवाढीची बाजाराला धास्ती

सत्रा दरम्यान निर्देशांकाची ४६० अंशांची आपटी

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सत्रा दरम्यान निर्देशांकाची ४६० अंशांची आपटी; दिवसअखेरही घसरण कायम

कृषी, ग्रामीण, आरोग्य, शिक्षण, पायाभूत क्षेत्रांसाठी करण्यात आलेल्या भरीव तरतुदीवर सुरुवातीला तेजीची प्रतिक्रिया देणाऱ्या भांडवली बाजारात अर्थसंकल्प दिनाच्या समाप्ती व्यवहारात भांडवली लाभावरील करवाढीने नाराजी व्यक्त  झाली.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प सादर करताना भांडवली बाजारातील व्यवहारातून १ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेवर होणाऱ्या लाभावर १० टक्के कर प्रस्तावित करण्याच्या घोषणेनंतर मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात एक टक्क्यापर्यंत आपटी अनुभवली गेली. यानंतर चालू तसेच आगामी वित्त वर्षांतील सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणातील वाढत्या वित्तीय तुटीच्या लक्ष्यावरही नकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये बुधवारच्या तुलनेत घसरणच राहिली. घसरणीसह सेन्सेक्स ३५,९०६.६६ वर स्थिरावला, तर १०.८० अंश घसरणीसह निफ्टी ११,०१६.९० पर्यंत थांबला. व्यवहारात दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ३५,५०१.७४ व १०,८७८.८० पर्यंत खाली आले होते.

अर्थमंत्र्यांनी अल्प कालावधीच्या भांडवली लाभावरील १५ टक्के कर कायम ठेवतानाच दीर्घकालीन भांडवली लाभावरील कर १० टक्के प्रस्तावित केला आहे. याची अनुरूप प्रतिक्रिया भांडवली बाजारात याबाबतच्या घोषणेनंतर उमटली. या दरम्यान सेन्सेक्सने ३६ हजारांचा तर निफ्टीने ११ हजारांचा टप्पाही सोडला.  सेन्सेक्स व निफ्टीने सत्राची सुरुवात तेजीसह केली होती. सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरही निर्देशांकातील तेजी कायम होती. अर्थसंकल्पातील पायाभूत, आरोग्य, कृषी क्षेत्रावरील भरीव आर्थिक तरतुदी व योजनांवर दोन्ही निर्देशांकांमध्ये उसळी नोंदली गेली. मात्र दीर्घकालीन भांडवली लाभावरील करवाढीनेही उसळी निर्देशांकांना घसरणीच्या दिशेने घेऊन गेली. २५ टक्के कंपनी कराच्या लाभार्थीची मर्यादा वार्षिक २५० कोटी रुपयांच्या उलाढाल असणाऱ्या उद्योगाकरिता वाढविल्यानंतरही बाजाराने त्याकडे दुर्लक्ष केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Union budget highlight 2018 reviews part

ताज्या बातम्या