बोटं चोखून का टुंबड भरते?

अतिमहनीय व्यक्तींसाठी दोन नवी विमाने

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत यंदा एकंदरीत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तरतूदींमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी रस्ते बांधणी, रेल्वे, बंदर विकास, विमानतळ आणि ग्रामीण विद्युतीकरणासाठी ४.९५ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा सार्वकालिक उच्चांकी अशी ५.९७ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, कोणतीही नवीन योजना जन्माला न घालता आधीच्याच योजनांचा पाठपुरावा करण्याचे सरकारने नियोजन केले आहे. सरकारचा भांडवली खर्च वाढणे कौतुकास्पद असले तरीही वित्तीय संसाधने उभी कशी करणार, वाडवळी बोलीत बोलायचे तर बोटें चोखून टुंबड कसे भरणार, यावर प्रश्नचिन्ह आहेच.

गेल्या वर्षांतील मोठय़ा प्रमाणावर झालेले रेल्वे अपघात, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि उपलब्ध मनुष्यबळाचा अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी होत असलेला वापर या कारणांमुळे टीकेचे धनी ठरलेल्या रेल्वे खात्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘सुरक्षेला प्राथमिकता’चा नारा दिला. तब्बल १३ टक्कय़ांची वाढ करत तरतूद १,४८,५२८ लाख कोटींवर नेण्यात आली आहे. मात्र, महत्त्वाच्या मार्गावर नव्या रेल्वे गाडय़ा सुरू करण्याच्या पायंडय़ाला पहिल्यांदाच टाळण्यात आला आहे. महत्त्वाच्या ६०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि २५ हजार सरकत्या जिन्यांचे आश्वासन यावेळी देण्यात आले. गेल्या वर्षी एकत्रित अर्थसंकल्पामध्ये रेल्वेसाठी १.३१ लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदाचा हा दुसरा संयुक्त अर्थसंकल्प होता.

५० लाख कोटींची गरज

पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची गरज लागणार आहे आणि पायाभूत सोयी या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी गरजेच्या आहेत. यामुळे सकल राष्ट्रीय उत्पन्नही वाढेल. यासाठी आपल्याला ५० लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीची गरज आहे. या निधीतून रस्ते, विमानतळ, रेल्वे, बंदरे आणि अंतर्गत जलवाहतूक जोडण्यास मदत होणार आहे. तसेच पर्यटनवाढ आणि वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी सीप्लेनची सुविधा देण्याचा विचार असल्याचे जेटली यांनी सांगितले.

अतिमहनीय व्यक्तींसाठी दोन नवी विमाने

  • देशातील विमान वाहतुकीसाठी यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतूद जवळपास अडीज पटींनी वाढविण्यात आली आहे. त्यातूनच अतिमहनीय व्यक्तींसाठी दोन नवी विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. यामुळे यंदा विमानोड्डाण मंत्रालयाला ६६०२ कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे.
  • गेल्या आर्थिक वर्षांमध्ये हीच तरतूद २७१०.३१ कोटींची करण्यात आली होती. यंदाच्या तरतुदीपैकी ४४६९.५० कोटी खर्च हा केवळ दोन आलिशान विमाने खरेदी करण्यावर होणार आहे. ही विमाने बोइंग ७७७-३०० ईआर या कंपनीची असणार आहेत.
  • उडान योजनेला बळ देण्यासाठी गेल्या वर्षीची २००.११ कोटींची तरतूद वाढवून यंदा १०१४.०९ कोटी करण्यात आली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी आणि राष्ट्रीय विमानोड्डान विद्यापीठासाठी ५० कोटींचा निधी देण्यात आला आहे.
  • डीजीसीए आणि बीसीएएससाठी अनुक्रमे २१० आणि ७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

नऊ हजार किमींचे राष्ट्रीय महामार्ग

पुढील वर्षांत ९ हजार किमींचे नवे राष्ट्रीय महामार्ग उभारणीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अंतर्गत आणि विकासापासून दूर असलेल्या ठिकाणांसह देशाच्या सीमारेषाही ‘भारतमाला’ योजनेंतर्गत जोडण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील ३५ हजार किमींच्या महामार्गासाठी ५.३५ लाख कोटींची खर्च अपेक्षित असल्याचे जेटली यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Union budget highlight 2018 reviews part

ताज्या बातम्या