प्रत्येक अर्थसंकल्पात अर्थमंत्री हा ‘रॉबिनहूड’ होण्याचा प्रयत्न करतो. मात्र ‘रॉबिनहूड’ श्रीमंतांच्या खिशात हात घालून गरिबांना मदत करत असे. विद्यमान अर्थमंत्री हे ‘रॉबिनहूड’ बनण्याच्या प्रयत्नात श्रीमंतांच्या खिशातही धड हात घालत नाहीत अन् गरिबांनाही काही देत नाहीत. १३० कोटींच्या या देशात फक्त ४२ हजार ५०० श्रीमंत सरकारला सापडतात, हे किती धक्कादायक आहे. फक्त पुणे-मुंबईत मिळून दोन कोटी लोक राहतात. पुण्याची लोकसंख्या ६० लाख आहे. या दोन शहरातच हजारो श्रीमंत असतील. सरकारने श्रीमंतांच्या खिशात हात घालून घालून किती घातला, तर श्रीमंतांना आता अवघा दहा टक्के अतिरिक्त प्राप्तिकर भरावा लागणार आहे. खरं तर हा अर्थसंकल्प चंगळवादाला खतपाणी घालणारा आहे. रोज दुबईला म्हणजे परदेशात जाऊन दीड लाखांचं सोनं आणण्याची सवलत देण्याची तरतूद यात करण्यात आली आहे. पतीला पन्नास हजार आणि पत्नीला एक लाख सोनं करमुक्त देण्याची सवलत देण्यात आली आहे. मात्र, खेडय़ापाडय़ात उन्हातान्हात राबणारी शेतमजूर महिला, मजूर अथवा मध्यवर्गीयालाही परदेशातून करमुक्त सोने आणणे परवडणारे नाही. त्यामुळे अर्थमंत्री श्रीमंतांच्या खिशात हात घातल्याचा आभास  निर्माण करतात,गरिबांनाही मदत केल्याचा आभास निर्माण करतात. प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही. हे सरकार श्रीमंतांना अजिबात त्रास देत नाही. उलट श्रीमंतांच्या चंगळवादाला प्रोत्साहन देत आहे.