प्रवाशांना अधिकाधिक आरामदायी प्रवासासाठी राजधानी आणि शताब्दी गाडय़ांना ‘अनुभूती’ डबा जोडण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी प्रस्तावित केले. तथापि, अशा प्रकारच्या अधिक आरामदायी डब्यासाठी वेगळे भाडे आकारण्यात येणार असल्याचेही रेल्वेमंत्री म्हणाले.
राजधानी आणि शताब्दीच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच अधिक आरामदायी सेवा देण्याची मागणीही जोर धरत होती. त्याला अनुसरून निवडक गाडय़ांमध्ये अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असा एक डबा जोडण्यात येणार आहे. या डब्याला ‘अनुभूती’ असे नाव देण्यात येणार आहे, असे बन्सल म्हणाले.
डब्यात अस्वच्छता असल्यास प्रवासात गाडीतील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी एसएमएस यंत्रणाही निवडक गाडय़ांमध्ये पथदर्शक प्रकल्प म्हणून सुरू करण्यात येणार आहे. येणारे स्थानक आणि अन्य संबंधित सूचना प्रवाशांना मिळण्यासाठी उद्घोषक यंत्रणा आणि इलेक्ट्रॉनिक फलकही लावण्यात येणार आहेत.