Ashneer Grover Budget Reaction: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पावर प्रसिद्ध उद्योजक अश्नीर ग्रोव्हर यांनी दिलेली प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल झाली आहे. शार्क टँक इंडिया या टीव्ही शोमध्ये परीक्षक म्हणून त्यांनी काम केले होते. अश्नीर यांनी अर्थसंकल्प ‘वेळेचा पूर्णपणे अपव्यय’ असल्याचे म्हटले. ‘तुम्ही आमचा आणि तुमचाही रविवार खराब केला’, अशी खोचक प्रतिक्रिया अश्नीर यांनी दिली आहे.
काय म्हणाले अश्नीर ग्रोव्हर?
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अश्नीर यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. “अर्थसंकल्प पाहून मला शार्क टँक शोमध्ये एकाला फटकारल्याची आठवण करून दिली. बिलकुल टाइम वेस्ट किया आपने- अपना भी और हमारा भी!” (वेळेचा पूर्ण अपव्यय केला तुम्ही – तुमचा पण आमचाही), अशा शब्दात अश्नीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पोस्टवर नेटकरी झाले व्यक्त
अर्थसंकल्पाला वेस्ट ऑफ टाईम म्हणणाऱ्या अश्नीर यांच्या पोस्टवर नेटकरी देखील व्यक्त झाले आहे. एकाने ‘मी तुमच्या सहमत आहे, खरचं हे वेस्ट ऑफ टाईम होतं’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्या एकाने ‘दीड तास वाया गेला’, असे मत नोंदवले आहे. आणखी एकाने ‘रविवार वाया गेला फक्त निराशा पदरी पडली,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. काही जणांनी अर्थसंकल्प ‘ओके होता’, असे म्हटले आहे.
आयकर प्रणाली जैसे थे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. सीतारमण यांनी भाषणात “आत्मनिर्भर भारत”चा मुद्दा प्रकर्षाने मांडला. सीतारमण यांनी यावेळी अनेक मोठ्या घोषणा केल्या. आयकर प्रणालीत कोणताही बदल होणार नसल्याचेही त्यांनी भाषणात सांगितले. दरम्यान, या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका केली जात आहे.
विरोधकांकडून टीका
२०२६ च्या अर्थसंकल्पात मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्गासाठी काहीही नव्हते, अशी टीका काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केली आहे. तर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारवर ‘देशाची आर्थिक रचना नष्ट करण्याचा’ प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.

