BMC Budget 2022 Updates: मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना आज पालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. गेल्या वर्षी ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदाच्या सन २०२२ - २३ च्या अर्थसंकल्पाचं आकारमान वाढलं आहे. हा पालिकेच्या इतिहासात हा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात येणा-या अर्थसंकल्पात विकास कामांवर भर दिला जाणार असून कोणताही कर नसलेला अर्थसंकल्प असेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. करोनाचे संकट असल्याने अर्थसंकल्प ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात आला. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे वाढलेला खर्च आणि विविध सवलतींमुळे घसरलेले उत्पन्न यामुळे पालिकेचा जमाखर्चाचा ताळमेळ बिघडलेला आहे. मात्र, आगामी निवडणुकांमुळे आर्थिक शिस्त लावणे तर दूरच, उलट मतदारांना भुलविणाऱ्या नवनव्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. निवडणुकीच्या अगदी तोंडावर मांडल्या जाणाऱ्या या अर्थसंकल्पाला विकासाच्या दृष्टीने व राजकीय दृष्टीनेही खूप महत्त्व आहे.