Emplyoment For Youth Budget 2024 Announcements : गेल्या काही वर्षांपासून देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असून नवतरुणांनाही नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीत. परिणामी तरुणांची ही कोंडी लक्षात घेता इंटर्नशीप ते प्रत्यक्षात रोजगार मिळावा याकरता केंद्र सरकारने योजना आखली आहे. याकरता ते आस्थापनांनाही प्रोत्साहन देणार आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुढील पाच वर्षांसाठी ४.१ कोटी तरुणांना रोजगार देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी अर्थमंत्र्यांनी २ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात याकरता नागरिकांना कौशल्य निर्माण करण्यासाठी त्यांनी १.४८ कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत. ५ वर्षांच्या कालावधीत २० लाख तरुणांना कुशल केलं जाईल. एकूण १००० औद्योगिक प्रशिक्षण संस्था अपग्रेड केल्या जातील, अशीही घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.
हेही वाचा >> Tax Slabs 2024-25 Budget 2024 Live Updates: करदात्यांसाठी मोठी घोषणा; नव्या करप्रणालीत ३ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर…
इंटर्नशीप करणाऱ्यांना मिळणार ५ हजार रुपये
सरकार पाच वर्षांत एक कोटी तरुणांना ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी देणार आहे. इंटर्नला व्यावसायिक माहिती मिळेल. तसंच, याचं मानधन म्हणून ५ हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे. इंटर्नशिपची सुविधा देणाऱ्या कंपन्या प्रशिक्षण खर्चाच्या १० टक्के खर्च त्यांच्या संबंधित कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडातून करतील. कंपनी कायदा २०१३च्या कलम १३५ मधील नियम विशिष्ट उलाढाल आणि नफा असलेल्या कंपन्यांना गेल्या तीन वर्षांच्या त्यांच्या सरासरी निव्वळ नफ्याच्या २ टक्के कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रमांवर खर्च करणे बंधनकारक आहे. निर्मला सीतारामण म्हणाल्या की, रोजगार, कौशल्य, एमएसएमई आणि मध्यमवर्ग हे या अर्थसंकल्पातील प्रमुख क्षेत्र आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd