Cigarette Price Increase India: केंद्रीय अर्थसंकल्पात तथाकथित ‘हानिकारक वस्तूं’वरील करप्रणालीत सरकारने मोठा बदल केला आहे. बदललेल्या करप्रणालीमुळे आजपासूनच (१ फेब्रुवारी २०२६) सिगारेट, तंबाखू उत्पादने आणि पान मसाला महाग झाले आहेत. नवीन प्रणालीत सध्याच्या जीएसटी व्यतिरिक्त, अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि आरोग्य व राष्ट्रीय सुरक्षा उपकर लागू करण्यात आला आहे. हानिकारक उत्पादनांच्या वापरापासून नागरिकांना परावृत्त करणे हा या मागील उद्देश असल्याचे सांगितले जाते.

नवीन करप्रणालीमुळे काय बदल होणार?

१) या उत्पादनांवर २८ ऐवजी ४० टक्के सर्वोच्च जीएसटी आकारला जाईल.

२) २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यापासून अस्तित्वात असलेला नुकसान भरपाई उपकर बंद करण्याचा निर्णय.

३) सिगारेट आणि तंबाखू उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू.

४) पान मसाला उत्पादकांसाठी आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर लागू करण्याचा निर्णय.

लांबी, फिल्टर आणि डिझाइननुसार ठरणार सिगारेटचे दर

करप्रणालीत बदल झाल्यामुळे आता सिगारेटचा दर लांबी, फिल्टरचा प्रकार आणि डिझाइनवर आधारित राहणार आहे.

१) फिल्टर नसलेल्या लहान सिगारेट (६५ मिमी पर्यंत): प्रति सिगारेट सुमारे २.०५ रुपये उत्पादन शुल्क

२) फिल्टर असलेल्या लहान सिगारेट (६५ मिमी पर्यंत): प्रति सिगारेट सुमारे २.१० रुपये उत्पादन शुल्क

३) मध्यम लांबीच्या सिगारेट: प्रति सिगारेट सुमारे ३.६–४ रुपये उत्पादन शुल्क

४) लांब सिगारेट: प्रति सिगारेट सुमारे ५.४ रुपये उत्पादन शुल्क

५) प्रीमियम किंवा गैर-मानक डिझाइन: प्रति सिगारेट ८.५० रुपयांपर्यंत उत्पादन शुल्क

सिगारेट ७० ते ७२ रुपये होणार?

नवीन करप्रणालीमुळे कधीकाळी १८ रुपयांना मिळणारे सिगारेट आता ७०-७२ रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तंबाखू, गुटखा, जर्दा, खैनी आणि तत्सम उत्पादनांसाठी फॅक्टरी-खर्च-आधारित मूल्यांकनाच्या जागी एमआरपी-आधारित जीएसटी मूल्यांकन प्रणाली लागू करण्यात आली आहे. तसेच, आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर कायद्यांतर्गत नवीन नोंदणी अनिवार्य केली आहे.