मुंबई : देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी. अल्पभूधारक शेतकऱ्यांची शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रशिक्षित मनुष्य आणि उच्च-गुणवत्तेच्या तंत्रज्ञानावर भर दिला जाईल. त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल, असे बहुभाषिक भारत विस्तार एआय टूल सुरू करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी (ता. १) लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला.
देशाच्या कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमतेचे वारे वाहू लागले आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला कृत्रिम बुद्धिमतेची जोड मिळणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार भारत विस्तार एआय टूलची म्हणजे ‘व्हर्च्युल इंटीग्रेटेड सिस्टम टू एक्सेस अॅग्रीकल्चर रिसोर्स’ या बहुभाषिक एआय टूल विकसित केले जाणार आहे. हे टूल देशातील प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे अडचणीच्या, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना निर्णय घेण्यासाठी मदत होणार आहे. एआय टूलमुळे नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या नुकसानीची जोखीम कमी होईल, असेही अर्थमंत्री म्हणाल्या.
नारळ, काजू आणि चंदन उत्पादकांसाठी घोषणा
पीक वैविध्यता वाढावी, शेतीच्या उत्पादकतेत वाढ व्हावी, शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी आणि कृषी आणि संलग्न क्षेत्रात रोजगार निर्मिती व्हावी. या दृष्टीने किनारपट्टीवरील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला बळकटी देण्यासाठी नारळ, काजू, चंदन उत्पादकांसाठी विविध योजनांची घोषणाही अर्थंमंत्र्यांनी केली. त्यानुसार देशातील एक कोटी नारळ उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्याचे केंद्र सरकार लक्ष्य आहे. २०३० पर्यंत जागतिक स्तरावर काजू आणि भारतीय नारळाला प्रीमियम ग्लोबल ब्रॅड करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जाणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांच्या मदतीने भारतीय चंदन परिसंस्थेला गती दिली जाणार आहे.
मत्स्य व्यवसायाला बळकटी देणार अमृत तलाव योजना
मत्स्य व्यवसायला चालना दिली जाणार आहे. त्यासाठी ५०० जलाशय आणि अमृत तलावांचा समन्वयीत विकास केला जाणार आहे. मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी मत्स्य उत्पादनात वाढ करणे. मत्स्य बाजारपेठ विकसित करणे आणि मत्स्य व्यवसाय वृद्धीसाठी स्टार्टअप्स, महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे, असेही सीतारामण म्हणाल्या.
पशुपालन व्यवसायाला अनुदानित कर्ज मिळणार
पशुपालन व्यवसायासाठी अनुदानित कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. पशुपालन व्यवसायात चांगले प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी मजुरांना प्रशिक्षण दिले जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. पशुपालन आणि कुक्टपालनला प्रोत्साहन देण्यासाठी मूल्यसाखळीचा विकास केला जाईल. जेणेकरून पशुपालन आणि कुक्कुटपालन उत्पादनांना चांगला दर आणि बाजारपेठ उपलब्ध होईल, असेही अर्थमंत्री म्हणाल्या.

