Union Budget 2026 Raghuram Rajan Statement: सध्या जग अतिशय धोक्याच्या काळातून जात आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिक स्वतंत्र बाण्याची आणि कणखर बनविण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात दीर्घकालीन उद्दिष्टांवर भर दिला जायला हवा, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी नुकतेच केले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजन म्हणाले की, भारतात सुरूवातीला पंचवार्षिक योजना होती. परंतु, त्यावेळी अर्थसंकल्पाचा त्याच्याशी व्यवस्थित ताळमेळ घातला गेला नव्हता. आगामी अर्थसंकल्पात दीर्घकालीन उद्दिष्टांचा समावेश केला जाऊन, अर्थव्यवस्थेला अधिक कणखर बनविण्याबरोबरच ती वेगाने वाढ साधणारी असेल हे पाहायला हवे. भारताला सर्व देश मित्र मानतील, यासाठी देखील आणखी प्रयत्न गरजेचे आहे. अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून त्या दिशेने पावले उचलली जातील अशी आशा असल्याचे ते म्हणाले

सध्या जगासमोर आणि भारतीय अर्थव्यवस्थेसमोर अतिशय धोक्याचा काळ आहे. एआय क्षेत्रात गुंतवणुकीच्या प्रचंड संधी दिसत आहेत. असे असले तरी त्यावर अधिकाधिक अवलंबून राहणे धोकादायक ठरणारे आहे. यातून नैसर्गिक बाजारपेठ नजीकच्या काळात राहणार नाही. अशा परिस्थितीत भारताला पुरवठा साखळीत अधिक चांगले स्थान मिळावे, यासाठी आगामी अर्थसंकल्पात आयात शुल्कात कपातीचे पाऊल उचलावे लागेल. सध्या राज्यांकडून गुंतवणूकस्नेही धोरणे तयार केली जात आहे. यासारखी आणखी पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे राजन यांनी सांगितले.

अर्थव्यवस्थेत वाढ होणार

भारत ही वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे आपल्याला बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या शेजारी देशांशी चांगले संबंध वाढवावे लागतील.

भारताने १९९० मध्ये आणि २००० च्या सुरूवातीला मोठ्या आर्थिक सुधारणा केल्या. त्यानंतर आपण फारशा सुधारणा केलेल्या नाहीत. आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू होऊन सध्याच्या सरकारने नुकत्याच सुधारणा सुरू केल्या आहेत. त्यातून अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरात काही आधारबिंदूनी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

अमेरिका आणि चीन या जगातील दोन महासत्तांमधील अनिश्चित धोरणाच्या काळात आपल्यासाठी संधी निर्माण झाली आहे. याचा फायदा घेऊन आपण जागतिक पुरवठा साखळीत आपले स्थान बळकट करावे, असे राजन यांनी नमूद केले.