India Economic Growth Forecast 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी लोकसभेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, एप्रिल २०२६ मध्ये सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ६.८ टक्के ते ७.२ टक्क्यांच्या दराने वाढेल. वार्षिक आर्थिक सर्वेक्षणातील हा अंदाज या आर्थिक वर्षाच्या ७.४% च्या अंदाजानुसार मंदावलेला आहे.

मुख्य आर्थिक सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली अर्थ मंत्रालयाने तयार केलेल्या या सर्वेक्षणात २०२५-२६ या वर्षातील आर्थिक कामगिरी आणि प्रमुख निर्देशकांचा आढावा घेण्यात आला आहे आणि पुढील आर्थिक वर्षासाठीचा दृष्टिकोन सादर केला आहे. सीतारामण रविवारी (१ फेब्रुवारी २०२६) यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.

तत्पूर्वी, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात माध्यमांना संबोधित करून केली.

यावेळी त्यांनी एक दिवस आधी दिलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाचे कौतुक करत, ते भाषण ‘१४० कोटी नागरिकांच्या आत्मविश्वासाची अभिव्यक्ती’ असून त्यात तरुणांच्या आकांक्षा मांडल्या आहेत, असे म्हटले.

त्यांनी युरोपियन युनियनसोबतच्या मुक्त व्यापार कराराचेही कौतुक केले आणि त्याला ‘महत्वाकांक्षी भारताच्या’ दिशेने टाकलेले पाऊल म्हटले. तसेच त्यांनी उत्पादकांना नवीन बाजारपेठांचा फायदा घेण्याचे आवाहन केले.

आर्थिक सर्वेक्षणात भारताच्या आरोग्य धोरणामध्ये सार्वजनिक आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर आधारित दृष्टिकोनाकडे धोरणात्मक बदलावर भर देण्यात आला आहे, कारण दीर्घकालीन आर्थिक उत्पादकता निरोगी मानवी भांडवलावर अवलंबून असते हे त्यात मान्य केले आहे.

यामध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे विकार, मधुमेह, लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्य समस्यांसारख्या असंसर्गजन्य रोगांचे वाढता प्रमाण अधोरेखित करण्यात आले आहे. याचा संसर्गजन्य रोगांच्या सततच्या आव्हानासोबतच आता कामाच्या वयोगटातील लोकांवरही परिणाम होत आहे.

मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये डिजिटल व्यसन आणि स्क्रीन-संबंधित मानसिक आरोग्य समस्यांमध्ये होणारी वेगाने वाढ ही एक मोठी चिंता म्हणून समोर आणली आहे.

सर्वेक्षणामध्ये सायबर-सुरक्षा शिक्षण, मार्गदर्शक कार्यक्रम, शाळांमध्ये अनिवार्य शारीरिक हालचाल, स्क्रीन-टाइम व्यवस्थापनासाठी पालकांचे प्रशिक्षण, वयानुसार डिजिटल माध्यमांचा वारर आणि हानिकारक कंटेंटसाठी प्लॅटफॉर्मची जबाबदारी यासह इतर हस्तक्षेपांची शिफारस केली आहे.

यामध्ये शैक्षणिक वापरासाठी आणि मनोरंजनात्मक वापरासाठी वेगवेगळे डेटा प्लॅन आणि उच्च-जोखमीच्या कंटेंटच्या श्रेणींचे डीफॉल्ट ब्लॉकिंग यांसारख्या नेटवर्क-स्तरावरील सुरक्षा उपायांचा देखील उल्लेख आहे.