scorecardresearch

Economic Survey 2022 : विकासदरातील २०२०-२१ मधील आकुंचन ६.६ टक्क्यांचेच ! ; राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून सुधारित अंदाज

र्थिक वर्ष २०१९-२० मध्ये सकल मूल्यवर्धनात ३.८ टक्के वाढ दिसून आली होती.

नवी दिल्ली : करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अर्थचक्र मंदावल्याने सरलेल्या २०२०-२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग शून्याखाली घसरला होता. मात्र हे आंकुचन (उणे) ६.६ टक्क्यांपर्यंतच होते, असा सुधारित अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) सोमवारी जाहीर केला. सरकारने मे २०२१ मध्ये जाहीर केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, २०२०-२१ मधील सकल राष्ट्रीय उत्पादनवाढीचा (जीडीपीचा) दर उणे – ७.३ टक्क्यांपर्यंत आक्रसल्याचे म्हटले होते.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, स्थिर किमतींवर (२०११-१२) आधारित सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १३५.५८ लाख कोटी रुपये अंदाजले आहे. तुलनेने वर्ष २०१९-२० साठी जीडीपीचे केले गेलेले पूर्वानुमान १४५.१६ लाख कोटी रुपये होते. परिणामी २०२०-२१ मध्ये वास्तविक जीडीपी (उणे) -६.६ टक्क्यांपर्यंत आकुंचन पावले, असे एनएसओने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे स्पष्ट केले. त्या आधीच्या २०१९-२० आर्थिक वर्षांत जीडीपीमध्ये ३.७ टक्क्यांची वाढ झाली होती.

एनएसओच्या सुधारित अनुमानानुसार, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये आर्थिक वर्षांत नाममात्र (नॉमिनल) जीडीपी १.४ टक्क्यांनी आकुंचन पावत १९८.०१ लाख कोटी राहिल्याचे अंदाजले गेले आहे जी २०१९-२० आर्थिक वर्षांत २००.७५ लाख कोटी होती. त्याचप्रमाणे स्थिर किमतींवर (२०११-१२) आधारित सकल मूल्यवर्धन (जीव्हीए) २०२०-२१ मध्ये ४.८ टक्क्यांनी आकुंचन पावले आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये सकल मूल्यवर्धनात ३.८ टक्के वाढ दिसून आली होती.

मराठीतील सर्व Budget 2022 ( Budget ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian economy contracts by 6 6 percent in 2020 21 zws