‘देशभक्त नथुराम गोडसे’ या चित्रपटावर बंदी आणू नये, प्रत्येकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करावे, अशा फुटकळ सिनेमामुळे महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाला कणभरही धोका नसल्याचा प्रतिवाद करीत लोकशाहीवादी वकिलांनी मंगळवारी न्यायालयात हस्तक्षेप अर्ज केला आहे. त्यावर २८ जानेवारी रोजी दिवाणी न्यायाधीश के. एम. पिंगळे-कुबेर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
‘देशभक्त नथुराम गोडसे’ हा वादग्रस्त चित्रपट येत्या ३० जानेवारी रोजी प्रदर्शित होत असून त्या पाश्र्वभूमीवर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला बंदी घालावी म्हणून अॅड. वाजीद खान यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्याची मंगळवारी सुनावणी होती. त्या वेळी लोकशाहीवादी वकील अॅड. असीम सरोदे, अॅड. विकास शिंदे यांनी या दाव्यात हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. त्यावर दोन्ही बाजूलाच्या वकिलांना म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.