मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारातील तरलता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींना देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूक करण्याची मुभा दिली आहे. अनिवासी भारतीयांना पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट योजनांतर्गत थेट भारतीय समभागांमध्ये गुंतवणूक करता येईल.
भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींना पोर्टफोलिओ गुंतवणूक योजनेद्वारे सूचिबद्ध भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिली जाईल. या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी गुंतवणुकीची मर्यादा ५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे, तर सर्व देशाबाहेर राहणाऱ्या व्यक्तीसाठी एकूण गुंतवणुकीची मर्यादा सध्याच्या १० टक्क्यांवरून २४ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. देशांतर्गत भांडवली बाजारात भांडवलाचा ओघ वाढण्यासह डॉलरच्या तुलनेत रुपया स्थिर होण्यास मदत होण्याची आशा आहे.
अनिवासींना भारतीयांना देशांतर्गत भांडवली बाजाराविषयी आकर्षण आहे आणि त्यांना त्यात गुंतवणूक करण्याची तीव्र इच्छा आहे. या स्वागतार्ह उपायामुळे केवळ भांडवलाचा ओघ वाढणार नाही, तर चलन आणि भांडवली बाजार स्थिर होण्यासही मदत होईल. – मनोज पुरोहित, वित्तीय सेवा कर, कर आणि नियामक सल्लागार, बीडीओ इंडिया.
भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींना देशांतर्गत बाजारात गुंतवणूक करण्याची परवानगी देणे ही एक सकारात्मक सुधारणा आहे. देशांतर्गत भांडवली बाजाराचा आवाका वाढण्यायसाठी, तरलता सुधारण्यासाठी आणि बाजारातील सहभाग वाढवण्यासाठी हे एक ठोस पाऊल आहे. – हिमांशू श्रीवास्तव, मुख्य संशोधन विश्लेषक, मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडिया.

