मुंबई : मुंबईसह राज्यात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळणार आहे. मात्र आगामी अर्थसंकल्पात एकही मोठा नवीन प्रकल्प जाहीर करण्यात आला नसून जुने आणि काम सुरू असलेले प्रकल्प पूर्णत्वास नेणे, तसेच घोषित प्रकल्पांच्या कामास सुरुवात करणे यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा आणि मुंबई पारबंदर प्रकल्प या वर्षांत पूर्ण करण्याकडे राज्य सरकारचा कल आहे, तर मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो मार्गिकांची कामे सुरू करणे, तसेच विरार- अलिबाग बहुउद्देशीय महामार्गिकेचे काम मार्गी लावणे हाही प्राधान्यक्रम आहे.
अर्थमंत्र्यांनी मुंबई वा राज्यासाठी एकही नवीन मोठा प्रकल्प घोषित केलेला नाही. मात्र त्याच वेळी काम सुरू असलेले आणि जुने प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आणि घोषित प्रकल्प सुरू करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील सध्याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी असा मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. ७०१ किमी महामार्गातील नागपूर- शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू झाला आहे. या मार्गावरून आतापर्यंत दहा लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तर उर्वरित टप्प्याचे ८८ टक्के काम पूर्ण झाले असून संपूर्ण मार्ग डिसेंबरमध्ये सेवेत दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Already have an account? Sign in