Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. तसेच अर्थमंत्री सीतारमण यांचा हलवा बनवितानाचा एक फोटो दाखवून त्यात एकही मागास समूहातील अधिकारी नसल्याचे सांगितले होते. त्यावर आज सीतारमण यांनी उत्तर दिले. अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये किती एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचे अधिकारी होते, हे विचारून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे मोठे षडयंत्र आहे, असा आरोप सीतारमण यांनी केला.

सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अर्थसंकल्पावर बोलत असताना त्याला महाभारतातील चक्रव्यूहाची उपमा दिली. मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा चक्रव्यूह असल्याचे ते म्हणाले. त्यांनी अर्थसंकल्प सादर होण्याअगोदरच्या हलवा समारंभाचा फोटो दाखविला. “अर्थसंकल्पाआधी हलवा वाटला जात असल्याचे या फोटोत दिसत आहे. पण खाणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये एकही ओबीसी, दलित किंवा आदिवासी समाजातील अधिकारी नाही. संपूर्ण भारताचा हलवा फक्त २० लोकांनी वाटून खाल्ला”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

हे वाचा >> अर्थसंकल्पात बिहार-आंध्र प्रदेशला झुकतं माप दिल्याचा ‘इंडिया’ आघाडीचा आरोप; निर्मला सीतारमण यांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

राहुल गांधी यांनी जेव्हा लोकसभेत हा आरोप केला तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण सभागृहातच बसल्या होत्या. राहुल गांधींचे विधान ऐकून त्यांना हसू आवरले नाही आणि त्यांनी स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला होता. निर्मला सीतारमण यांनी पुढे म्हटले की, पंडीत जवाहरलाल नेहरू किंवा राजीव गांधी हे दोघेही आरक्षणाच्या विरोधात होते. तसेच राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तपदी किती एससी / एसटीचे लोक होते? असाही सवाल निर्मला सीतारमण यांनी उपस्थित केला.