Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते, कारण मोदी सरकार २.० चा हा अखरेचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सरकार गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय, व्यावसायिक इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मोदी सरकार काय देणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून यावर टीका सुरू आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर करण्यात आला असल्याचं म्हटलं जात आहे. तर सत्ताधाऱ्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आता निवडणुका आहेत म्हणून बजेट करायचं नाही का? हे दरवर्षी होणारं बजेट आहे. विरोधी पक्षाने खऱ्या अर्थाने स्वागत केलं पाहिजे. रेल्वेसाठी किती तरी मोठ्याप्रमाणात बजेट दिलं आहे. माझ्या माहितीनुसार २०१३ पासून ते आतापर्यंत नऊ पटीने रेल्वेसाठी बजेट वाढवलेलं आहे.”
“सगळ्याच समाजघटकांना न्याय देण्याचं काम करण्यात आलं आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानला गेला आहे. कुठलाही असा घटक नाही की तो या अर्थसंकल्पात वंचित राहील. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आतापर्यंत कोणत्याही बजेटमध्ये एवढी तरतूद केली नव्हती, तेवढी तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे.” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या पदरी घोर निराशा आली आहे. तसेच भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन करण्याबाबत अर्थमंत्र्यांनी कोणतंही विधान केलं नाही, असंही राऊत म्हणाले आहेत. मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केंद्रीय अर्थसंकल्पातून करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करताना शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करण्याचं यापूर्वी सूचित केलं होतं. शेतकऱ्यांच्या दुप्पट झालेल्या उत्पन्नाला योग्य तो बाजारभाव देण्यासाठी ठोस उपाय योजना करायला हवी होती, ती केली गेली नाही.” अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.