Budget 2026 Impact on Sensex Stock Market: केंद्रीय अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स वाढवल्यानं बाजारात घसरण झाली आहे. निफ्टी ७८३ अंकांनी घसरला असून, सेन्सेक्स १८७७ अंकांनी कोसळला आहे. अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात मोठा हाहाकार पाहायला मिळत असून, गुंतवणूकदार हवालदील झाले आहेत.

फ्युचर्स आणि ऑप्शन्स व्यवहारांवर करवाढ

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F&O) व्यवहारांवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) मधील वाढ जाहीर केल्यानंतर यावर गुंतवणूकदारांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. “फ्युचर्सवरील एसटीटी सध्याच्या ०.०२ टक्क्यांवरून ०.०५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव देत आहे. ऑप्शन्स प्रीमियम आणि ऑप्शन्सच्या वापरावरील एसटीटी अनुक्रमे सध्याच्या ०.१ टक्के आणि ०.१२५ टक्क्यांवरून ०.१५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे,” अशी घोषणा सीतारमण यांनी केली आहे.

सकाळी नोंदवली होती वाढ

केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणास सुरुवात झाली त्यावेळेस सकाळी सुमारे ११:१५ वाजता, सेन्सेक्स ४२१.८५ अंकांनी (०.५१ टक्के) वाढून ८२,६९१.६३ वर व्यवहार करत होता, तर व्यापक निफ्टी ११०.८० अंकांनी (०.४४ टक्के) वाढून २५,४३२.४५ वर व्यवहार करत होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) यांनी स्वतंत्र परिपत्रके जारी करून अर्थसंकल्पाच्या दिवशीही मार्केट सुरू राहतील असे स्पष्ट केले होते. नियमित ट्रेडिंग सत्राच्या प्रमाणित वेळापत्रकात बदल होणार नाही, असे दोन्ही एक्सचेंजेसनी सांगितले होते.

१८८६ शेअर्समध्ये वाढ

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी निफ्टी ५० मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे शेअर्स सर्वाधिक वाढले. या शेअर्समध्ये २ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली. तर हिंदाल्को इंडस्ट्रीज आणि नेस्ले इंडिया या शेअर्सची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यात ४ टक्क्यांपर्यंत घट झाली. १८८६ शेअर्समध्ये वाढीसह बाजाराची सुरुवात सकारात्मक होती. तर, १३९७ शेअर्समध्ये घट झाली आणि १५१ शेअर्समध्ये कोणताही बदल झाल्याचे दिसले नाही.

सोने – चांदीच्या भावात घसरण

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर होण्यापूर्वी, रविवारी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. २ एप्रिल २०२६ रोजी डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याच्या भावात ९,१४० रुपयांची, म्हणजेच ६% ची घसरण होऊन तो प्रति १० ग्रॅम १,४३,२०५ रुपयांवर आला, तर ५ मार्च २०२६ रोजी डिलिव्हरी होणाऱ्या चांदीच्या भावात १७,५१५ रुपयांची, म्हणजेच ६% ची घसरण होऊन तो प्रति किलो २,७४,४१० रुपयांवर पोहोचला.

सेन्सेक्स १५४६ अंकांवर बंद

एसटीटी वाढीच्या घोषणेनंतर १७०० अंकांच्या घसरणीतून काहीसा सावरत सेन्सेक्स १५४६.८४ अंकांवर बंद झाला. एनएसई ४९५.२० अंकांनी (-१.९६ टक्के) घसरून २४,८२५.४५ अंकांवर बंद झाला. रविवारी शेअर बाजारात ब्रोकरेज-संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कमोडिटी फ्युचर्स आणि ऑप्शन्सवरील कर वाढवण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडल्यानंतर मार्केट १८ टक्क्यांनी कोसळले.