Union Budget 2026 Share Market Open On Sunday: येत्या १ फेब्रुवारीला रविवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या दिवशी शेअर बाजारातील व्यवहार नियमितपणे सुरू ठेवण्याचा निर्णय दोन्ही बाजार मंचांनी घेतला आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात शेअर बाजार रविवारी सुरू राहण्याची ही केवळ दुसरीच वेळ असेल. अलीकडेच, २०२५ च्या अर्थसंकल्पाच्या वेळी बाजार शनिवारी सुरू होता, जे प्रमुख धोरणात्मक घटनांदरम्यान थेट बाजारात सहभागास परवानगी देण्याच्या दिशेने होत असलेल्या बदलाचे प्रतीक आहे.

साधारणपणे शनिवारी आणि रविवारी भांडवली बाजारातील व्यवहार बंद असतात. मात्र गेल्यावर्षी, म्हणजेच १ फेब्रुवारी २०२५ रोजी शनिवारी अर्थसंकल्प सादर करण्यात आला, त्यावेळीही बाजार खुले ठेवण्यात आले होते.

मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) यांनी याबाबत घोषणा केली असून, २०२६ च्या अर्थसंकल्पासाठी १ फेब्रुवारी रोजी शेअर बाजार ट्रेडिंगसाठी खुला राहील. त्या दिवसाचे वेळापत्रक नेहमीच्या वेळेनुसार असेल.

१ फेब्रुवारी २०२६ रोजी नेहमीच्या बाजार वेळेनुसार सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० पर्यंत नियमितपणे व्यवहार पार पडतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामण २०२६-२७ साठी सलग नववा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील, जो स्वातंत्र्यानंतरचा भारताचा ८०वा अर्थसंकल्प असेल. २०१७ मध्ये केंद्र सरकारने १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पाची तारीख २८ फेब्रुवारीवरून १ फेब्रुवारी निश्चित केली होती.

वर्ष २००० नंतर रविवारच्या दिवशी अर्थसंकल्प सादर होण्याची ही पहिलीच वेळ असली तरी, आठवड्याच्या शेवटी अर्थसंकल्प सादर करणे ही काही अभूतपूर्व घटना नाही. सीतारामण यांच्या कार्यकाळात २०२५ चा अर्थसंकल्प शनिवारी सादर करण्यात आला होता, तर अरुण जेटली यांच्या कार्यकाळातही २०१५ चा अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी २०१५ रोजी शनिवारी सादर झाला होता.

कमॉडिटी बाजारही सुरू राहणार

१ फेब्रुवारी रोजी कमोडिटी बाजारही खुले राहतील. एमसीएक्स नियमित वेळेनुसार एक विशेष थेट ट्रेडिंग सत्र आयोजित करेल.
एमसीएक्सचे प्री-ओपन सत्र सकाळी ८:४५ वाजता सुरू होईल आणि ८:५९ पर्यंत चालेल, तर सामान्य ट्रेडिंग सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होईल. क्लायंट कोडमध्ये बदल करण्याची परवानगी सायंकाळी ५:१५ पर्यंत असेल. या निर्णयामुळे अर्थसंकल्प जाहीर होत असताना सोने, चांदी, कच्चे तेल आणि कृषी-संबंधित करारांसारख्या कमोडिटीजमध्ये अखंडित ट्रेडिंग निश्चित होते.

बजेटच्या दिवशी बाजाराची कामगिरी कशी राहिली आहे?

ऐतिहासिकदृष्ट्या, बजेटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठे चढ-उतार दिसून आलेले नाहीत. गेल्या १५ वर्षांतील आकडेवारी दर्शवते की, बजेटच्या दिवशी निफ्टीमधील सरासरी हालचाल केवळ ०.१९% राहिली आहे, जे सूचित करते की तीव्र प्रतिक्रिया तुलनेने दुर्मिळ असतात.