scorecardresearch

CNG स्वस्त; शेतकऱ्यांना अनुदान आणि…; जाणून घ्या राज्याच्या अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या घोषणा

या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने राज्य सरकारने कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं आहे.

Maharashtra Budget 2022 ajit pawar one trillion dollars economy

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्य सरकारकडून विकासाची पंचसूत्री हा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची घोषणा पवार यांनी केली. या पंचसूत्रीअंतर्गत येणाऱ्या कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी १ लाख १५ हजार २१५ कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असल्याची माहिती दिली.


कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी २३,८८८ कोटींची तरतूद केली असून आरोग्य क्षेत्रासाठी ५,२४४ कोटी रुपये तरतूद केली आहे. मानव व मनुष्यबळ विकासासाठी ४६,६६७ कोटींची तरतूद केली आहे तर पायाभूत सुविधा व वाहतुकीसाठी २८,६०५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उद्योग व उर्जा विभागासाठी १०,१११ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या या काही मुख्य घोषणांविषयी जाणून घ्या…

 • नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान
 • भूविकास बँकेच्या ३४, ७८८ कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी
 • हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. तसंच हवेली इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार असून यासाठी २५ कोटींची घोषणा करण्यात आली आहे.
 • देशातल्या तरुणांना इथेच वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • मुंबईतील सेंट जॉर्ज, नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरमधील बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे.
 • पदव्युत्तर अभ्यासक्रमात आधुनिक तंत्रात फिजिओथेरपी तंत्राचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
 • महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्केची तरतूद आता वाढवून ५० टक्के केलेली आहे. तसंच हे वर्ष महिला शेतकरी आणि मजूर वर्ष म्हणून साजरं केलं जाईल.
 • आरोग्य सेवांवर येत्या ३ वर्षांत ११ हजार कोटी खर्च करण्याचं सरकारचं नियोजन आहे. शासकीय ट्रॉमा केअर युनिट्स स्थापन करण्यासाठी १०० कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी १८ कोटींचा निधी. टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरला आयुर्वेदिक संशोधन केंद्रासाठी १० हेक्टर जमीन देण्यात येईल.
 • भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी देणार
 • महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ३००० नवीन बसगाड्या व १०३ बसस्थानकांच्या आधुनिकीकरण यासाठी भांडवली अर्थसहाय्य
 • करोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी पंडिता रमाबाई महिला उद्योजक योजनेची घोषणा, या महिलांना स्वयंरोजगरासाठी भांडवल उपलब्ध करून देणार
 • गडचिरोली येथे नवीन विमानतळाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसंच राज्यामध्ये विद्युत वाहनांची संख्या वाढवण्याचे प्रस्तावित आहे. २०२५ पर्यंत ५००० चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
 • मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या निवासाची तात्पुरती सोय व्हावी यासाठी नवी मुंबई इथं महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
 • पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूचा घरगुती वापर होतो, CNG वर चालणाऱ्या वाहनांना फायदा होतो. मूल्यवर्धित कर VAT चा दर हा १३.५टक्क्यांवरून टक्के वरून ३ टक्के करायचा प्रस्ताव आहे. यामुळे ८०० कोटी महसुली घट होईल, असं अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.
 • शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिंनीसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन डिस्पेन्‍सिंग मशिन
 • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापुरूषांशी संबंधित गावांतील १० शाळांकरिता १० कोटी रुपये निधी
 • हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा नागपूर ते भंडारा-गोंदिया,नागपूर ते गडचिरोली असा विस्तार करणार.
 • मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत रोजगाराच्या ३ लाख ३० हजार नवीन संधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १ लाख रोजगाराच्या नव्या संधी

मराठीतील सर्व Budget 2022 ( Budget ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What we get through the maharashtra budget 2022 for common people vsk