ज्यांनी आपल्या कष्टाचे पैसे बँक ऑफ बडोदामध्ये जमा केले आहेत, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये आता अधिक व्याज मिळणार आहे. बँक (BoB) ने देशांतर्गत किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात २५ बेसिस पॉइंट म्हणजेच ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. नवे दर १७ मार्च २०२३ पासून लागू झाले आहेत.
बँक ऑफ बडोदाने निवडक मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. ज्या ठेवींवर व्याजदर वाढले आहेत, त्यात अनिवासी सामान्य (NRO) खाते आणि अनिवासी बाह्य (NRE) मुदत ठेवींचा समावेश आहे. बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, हे दर २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर लागू होतील.
या योजनांचे व्याजदरही वाढवले
बँक ऑफ बडोदा टॅक्स सेव्हिंग टर्म डिपॉझिट आणि बडोदा अॅडव्हांटेज फिक्स्ड डिपॉझिटवरही व्याजदर वाढवण्यात आले आहेत. ३ वर्षे ते ५ वर्षे कालावधीसाठीच्या ठेवींवर आता ६.५ टक्के व्याज मिळणार आहे. निवासी भारतीय ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत हे प्रमाण ७.१५ टक्के आहे. ५ वर्षे ते १० वर्षे मुदतीच्या ठेवींवर ६.५ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.५ टक्के व्याजदर असेल.
बँकेने डिसेंबरमध्ये रिटेल मुदत ठेवींच्या व्याजदरातही वाढ केली होती
बँक ऑफ बडोदाने यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये रिटेल मुदत ठेव व्याजदर ६५ बेसिस पॉइंट्सने आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये १०० बेसिस पॉइंट्सने वाढवले होते.
रेपो दरात पुन्हा वाढ होऊ शकते
मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत RBI ने रेपो रेट २.५० टक्क्यांनी वाढवला आहे. आरबीआय एप्रिलमध्ये एमपीसीत ०.२५ टक्क्यांनी वाढ करेल, अशी अपेक्षा आहे.