10 Lakh CTC In Hand Salary Calculation : नवीन नोकरी लागल्यावर किंवा प्रमोशन मिळाल्यानंतर किती पॅकेज मिळाले? हा प्रश्न सर्रास विचारला जातो. अशात १०-१२ लाखांचे पॅकेज असेल तर लगेच आपण महिन्याला किती पगार मिळेल याचा हिशोब करतो. “१० लाख भागिले १२ म्हणजे दरमहा ८३,००० रुपये महिन्याला हातात यायला पाहिजेत. पण, प्रत्यक्षात जेव्हा बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येतो, तेव्हा तो आकडा पाहून मोठा धक्का बसतो. कारण, आपल्या हिशोबाने ८३ हजारांऐवजी केवळ ५५,००० हजार रुपये हातात येतात. मग प्रश्न पडतो उरलेले पैसे गेले कुठे? जर तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. चला तर मग, सोप्या भाषेत समजून घेऊया या १० लाखांच्या ‘सीटीसी’ (CTC) मागचे मोठे गणित.

१. CTC म्हणजे नेमके काय?

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे CTC (Cost to Company) म्हणजे तुमचा पगार नव्हे! याचा साधा अर्थ असा की, कंपनी तुम्हाला वर्षभरात कामावर ठेवण्यासाठी एकूण किती खर्च करत आहे. यात तुमचा थेट पगार तर असतोच, पण त्याचसोबत कंपनी तुमच्या भविष्यासाठी आणि सुरक्षेसाठी करत असलेला अप्रत्यक्ष खर्चही जोडलेला असतो.

२. १० लाखांच्या पॅकेजमधून पैसे नक्की कुठे गायब होतात?

  • समजा तुमची वार्षिक CTC १० लाख रुपये आहे, तर त्यातून नेमकी कोणती कपात होते?
  • तुमच्या १० लाखांपैकी जवळपास १ ते १.५ लाख रुपये हे पीएफ आणि ग्रॅच्युइटीच्या रूपात बाजूला ठेवले जातात, जे तुमच्या नावावर गुंतवणूक केली जाते. दरमहा तुमच्या पगारातून बेसिकच्या १२% रक्कम पीएफसाठी कापली जाते.
  • सरकारच्या नियमांनुसार तुमच्या करपात्र उत्पन्नावर दरमहा टॅक्स कापला जातो. महाराष्ट्रात हा कर प्रतिमहा २०० रुपये आहे
  • जर पॅकेजमध्ये १ लाख रुपये व्हेरिएबल असतील आणि कंपनीचे टार्गेट पूर्ण झाले नाही, तर ती रक्कम पूर्णपणे कट होऊ शकते.

३. इन-हँड सॅलरी किती उरते?

सर्व प्रकारच्या कपाती वजा केल्यावर, १० लाखांच्या वार्षिक CTC पैकी प्रत्यक्ष तुमच्या बँक खात्यात वर्षभरात अंदाजे ७.५ ते ८.५ लाख रुपये इतकीच रक्कम जमा होते. म्हणजेच, महिन्याचा विचार केला तर ८३,३३३ रुपयांची कागदोपत्री दिसणारा पगार प्रत्यक्षात खिशात येताना ५५,००० ते ६५,००० रुपयांच्या आसपास येतो.

नोकरी बदलताना पगारावर कशी चर्चा करावी?

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही नवीन नोकरीसाठी मुलाखत द्याल किंवा ऑफर लेटर हातात पडेल, तेव्हा केवळ मोठ्या CTC आकड्यावर खूश होऊ नका. एचआरला स्पष्टपणे विचारा, की माझी इन-हँड सॅलरी दरमहा किती असणार आहे? यात व्हेरिएबल कंपोनंट किती आहे? फिक्स्ड पगार किती आहे?