ChatGPT Use for Clearing Debt: चॅटजीपीटी तंत्रज्ञान आल्यापासून त्याची चर्चा होत आहे. अनेकांनी या एआय टुल्सची क्षमता तपासून पाहिली असून लोक एआयचा वापर आता अधिकाधिक करू लागले आहेत. प्रोग्रामर कोड लिहिण्यासाठी तर विद्यार्थी गृहपाठ करण्यासाठी एआयचा वापर करतात. पण अमेरिकेतील एका महिलेने कर्ज फेडण्यासाठी एआयचा प्रभावी वापर केला आहे. महिलेनं २३ हजार डॉलरचं क्रेडिट कार्डचं बिल एआयच्या मदतीनं फेडलं. जेनिफर एलन (वय ३५) असं या महिलेचं नाव आहे.

जेनिफरनं एआय टुल चॅटजीपीटीच्या मदतीने क्रेडिट कार्डच्या बिलातील अर्ध्याहून अधिक रक्कम केवळ ३० दिवसांत चुकती केली. याबाबत न्यूजवीक वृत्त संकेतस्थळाशी बोलताना जेनिफरनं सांगितले की, माझं उत्पन्न बऱ्यापैकी होतं. पण आर्थिक नियोजन पक्क नसल्यामुळं गोंधळ होत होता.

जेनिफर आई झाल्यानंतर तिच्या कौटुंबिक जीवनातील आर्थिक अडचणी वाढल्या. मेडिकल बिल, बाळंतपणाचा खर्च वाढला. खर्च भागविण्यासाठी तिनं क्रेडिट कार्डचा अधिकाधिक वापर केला. जेनिफर म्हणाले, आम्ही चैन न करता रोजच्या गरजा क्रेडिट कार्डनं भागवत असले तरी माझ्यावरील कर्ज वाढत गेलं आणि मी त्याकडं फारसं लक्ष दिलं.

चॅटजीपीटीचा वापर कसा केला?

जेनिफरनं म्हटलं की, चॅटजीपीटीच्या माध्यमातून तिनं पर्सनल फायनान्स चॅलेंज सुरू केलं. याआधी पैसे कोणकोणत्या गोष्टीत खर्च होत आहेत, याची तिला कल्पनाच येत नव्हती. पैशांचं नियोजन करण्यासाठी तिनं अनेक ॲप्स वापरले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी रेडिटवर असताना तिला चॅटजीपीटीबाबत एक पोस्ट वाचायला मिळाली. चॅटजीपीटीचा वापर करून तुम्ही वैयक्तिक आर्थिक नियोजन केलं आहे का? अशा आशयाची ही पोस्ट जेनिफरसाठी उपयोगी ठरली.

३० दिवसांच्या पर्सनल फायनान्स चॅलेंजदरम्यान जेनिफरला रोज एक नवा टास्क दिला जायचा. यामध्ये पहिला टास्क होता, वापरात नसलेले सबस्क्रिप्शन बंद करणे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित खात्यांची माहिती गोळ करून एकत्रित करणे, घरी तयार केलेल्या जेवणाला प्राधान्य देत बाहेरचा अतिरिक्त किराणा कमी केला, बँक खात्याची माहिती बारकाईने तपासली आणि पैसे कुठे कुठे आहेत, याचा शोध घेतला.

वापरात नसलेले पैसे मिळाले

या चॅलेंजदरम्यान जेनिफरला तिच्या एका डिजिटल वॉलेटमध्ये निष्क्रिय पडून राहिलेला निधी मिळाला. या वॉलेटमध्ये १० हजार डॉलरपेक्षा अधिकची रक्कम वापराविना पडून असल्याचे तिच्या निदर्शनास आले. तसेच घरगुती जेवणामुळे तिच्या किराणा खर्चात ५० हजारांची बचत झाली. हे वाचलेले पैसे क्रेडिट कार्डचं बिल चुकते करण्याकडे तिनं वळवले.

३० दिवसांच्या चॅलेंजमध्ये जेनिफरने एकूण १२,०७८.९३ (जवळपास १० लाख रुपये) डॉलर्सची बचत केली. यातून तिला २० लाखांच्या कर्जाचा मोठा हप्ता कमी दिवसात चुकता करता आला. यानंतर आता जेनिफरनं आणखी ३० दिवसाचं चॅलेंज स्वीकारलं असून त्यानुसार काम करायला सुरुवात केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेसारख्या देशात वैयक्तिक कर्जाचा बोजा वाढत जात असताना जेनिफरच्या कल्पनेतून इतरांनीही प्रेरणा घेतल्यास अनेकांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी होण्यास मदत होऊ शकते.