8th Pay Commission Pensioner Fitment Factor : आठव्या वेतन आयोगाकडे डोळे लावून बसलेल्या लाखो केंद्रीय पेन्शनधारकांना दिलासादायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. आयोगाच्या शिफारशींनुसार केवळ कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारच नाही, तर निवृत्तीवेतनधारकांच्या मासिक पेन्शनमध्येही मोठी वाढ होऊ शकते. ही वाढ नक्की किती असेल, हे आयोग आणि सरकारद्वारे अंतिम मंजूर होणाऱ्या ‘फिटमेंट फॅक्टर’ आणि पेन्शन सुधारणा सूत्रावर अवलंबून असणार आहे. फिटमेंट फॅक्टर २.५ ते ३.५ नुसार पेन्शनमध्ये किती वाढ होऊ शकते? याचं सविस्तर विश्लेषण.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?
फिटमेंट फॅक्टर हा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मूळ वेतनात किंवा पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरला जाणारा एक गुणक आहे. सध्या मिळत असलेल्या मूळ पेन्शनला नव्या वेतनश्रेणीत रूपांतरित करण्यासाठी या गुणकाचा वापर केला जातो.
सुधारित मूळ पेन्शन = सध्याची मूळ पेन्शन × गृहीत धरलेला फिटमेंट फॅक्टर
समजा एखाद्या पेन्शनधारकाला सध्या २५,००० रुपये मूळ पेन्शन मिळत असेल आणि २.५ हा फिटमेंट फॅक्टर लागू झाला, तर त्यांची सुधारित मूळ पेन्शन ६२,५०० रुपये होईल.
८ वा वेतन आयोग: पेन्शन कॅल्क्युलेटर (संभाव्य गणित)
सध्या २५,००० ते ७५,००० रुपये मूळ पेन्शन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांसाठी २.५, ३.० आणि ३.५ या तीन वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टरनुसार किती पेन्शन मिळेल?
| सध्याची मूळ पेन्शन | २.५ फिटमेंट फॅक्टरवर | ३.० फिटमेंट फॅक्टरवर | ३.५ फिटमेंट फॅक्टरवर |
| २५,००० | ६२,५०० | ७५,००० | ८७,५०० |
| ३०,००० | ७५,००० | ९०,००० | १,०५,००० |
| ३५,००० | ८७,५०० | १,०५,००० | १,२२,५०० |
| ४०,००० | १,००,००० | १,२०,००० | १,४०,००० |
| ४५,००० | १,१२,५०० | १,३५,००० | १,५७,५०० |
| ५०,००० | १,२५,००० | १,५०,००० | १,७५,००० |
| ५५,००० | १,३७,५०० | १,६५,००० | १,९२,५०० |
| ६०,००० | १,५०,००० | १,८०,००० | २,१०,००० |
| ६५,००० | १,६२,५०० | १,९५,००० | २,२७,५०० |
| ७०,००० | १,७५,००० | २,१०,००० | २,४५,००० |
| ७५,००० | १,८७,५०० | २,२५,००० | २,६२,५०० |
(टीप: वरील सर्व आकडे केवळ विश्लेषणात्मक आणि काल्पनिक आकडेमोडीवर आधारित आहेत. ८ व्या वेतन आयोगाने अधिकृतपणे कोणत्याही फिटमेंट फॅक्टरची घोषणा केलेली नाही.)
दरमहा किती अतिरिक्त पेन्शन मिळू शकते?
| सध्याची मूळ पेन्शन | २.५ फॅक्टरनुसार अतिरिक्त वाढ | ३.० फॅक्टरनुसार अतिरिक्त वाढ | ३.५ फॅक्टरनुसार अतिरिक्त वाढ |
| २५,००० | ३७,५०० | ५०,००० | ६२,५०० |
| ३०,००० | ४५,००० | ६०,००० | ७५,००० |
| ४०,००० | ६०,००० | ८०,००० | १,००,००० |
| ५०,००० | ७५,००० | १,००,००० | १,२५,००० |
| ६०,००० | ९०,००० | १,२०,००० | १,५०,००० |
| ७५,००० | १,१२,५०० | १,५०,००० | १,८७,५०० |
महागाई भत्ता, कुटुंब पेन्शन आणि अंमलबजावणी कधी होणार?
- महागाई भत्ता : ही वाढ केवळ मूळ पेन्शनमधील आहे. सध्या मिळणारा ‘महागाई भत्ता’ मूळ पेन्शनमध्ये विलीन केला जाणार की स्वतंत्र ठेवला जाणार, याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारचा असेल.
- कुटुंब निवृत्तीवेतनधारक : ८ व्या वेतन आयोगाच्या चौकटीत निवृत्तीवेतनविषयक सर्व नियमांचा समावेश असल्यामुळे कुटुंब पेन्शनधारकांनाही या सुधारित रचनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
- ८ व्या वेतन आयोगाची स्थापना ३ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली असून समितीला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. वेतन आयोगाच्या दर १० वर्षांच्या चक्रानुसार १ जानेवारी २०२६ ही या सुधारणा लागू होण्याची तारीख मानली जात आहे.
