मुंबई : जागतिक आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲक्सेंचरने चालू आर्थिक वर्षासाठी महसूल वाढीचा अंदाज कमी केल्यानंतर भारतीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांच्या समभागांमध्ये शुक्रवारी मोठी घसरण झाली. मात्र या घसरणीमागे केवळ कृत्रिम प्रज्ञा (एआय) कारणीभूत नसून जागतिक मागणीत दिसणारी कमकुवत स्थिती, ग्राहकांचा खर्चातील सावधपणा आणि निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब ही मोठी कारणे असल्याचे विश्लेषकांनी सांगितले आहे

भारतीय आयटी कंपन्यांच्या व्यवसायाचा मोठा हिस्सा परदेशातील ग्राहकांकडून मिळणाऱ्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि सल्लागार प्रकल्पांवर अवलंबून असतो. मात्र सध्या अनेक कंपन्या खर्च कमी करण्याच्या भूमिकेत असल्याने नवीन प्रकल्पांवर निर्णय घेण्यास विलंब होत आहे. त्यामुळे महसूल वाढीची गती कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. एआयमुळे पारंपरिक आयटी सेवा व्यवसायावर दबाव येत आहे, अशी बाजारात धारणा होती. मात्र तज्ज्ञांच्या मते सध्याची घसरण ही केवळ एआयमुळे नाही.

ॲक्सेंचरने स्थिर-करन्सी महसूल वाढीचा अंदाज ३-५ टक्क्यांवरून कमी करून ३-४ टक्के केला आहे. जागतिक स्तरावर कॉर्पोरेट ग्राहक सध्या त्यांच्या तंत्रज्ञान खर्चाबाबत अत्यंत सावध भूमिका घेत असल्याचे यावरून स्पष्ट होते. भारतीय आयटी कंपन्या देखील याच जागतिक कंपन्यांच्या प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याने, या अंदाजाचा थेट नकारात्मक फटका भारतीय आयटी क्षेत्राला बसला आहे.

  देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या समभागामध्ये ८.५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली, तर इतर प्रमुख आयटी कंपन्यांनाही मोठा फटका बसला. घसरणीच्या सत्रात टेक महिंद्रचा समभाग ७ टक्क्यांनी घसरला. टीसीएसमध्ये ६.५२ टक्के, एचसीएल टेकमध्ये ६ टक्के तर विप्रोमध्ये ४,२९ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. परिणामी बीएसईचा आयटी निर्देशांक ५.१८ टक्क्यांनी कोसळला.

 भारतीय आयटी कंपन्यांचा मोठा व्यवसाय जागतिक ग्राहकांकडून येणाऱ्या प्रकल्पांवर अवलंबून असल्याने ॲक्सेंचरच्या या अंदाजाचा परिणाम संपूर्ण क्षेत्रावर झाला. यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

तज्ज्ञांचे मत काय?

भारतीय आयटी समभागांमधील सध्याची विक्री ही ॲक्सेंचरच्या महसूल अंदाजातील कपातीची थेट प्रतिक्रिया आहे. जागतिक स्तरावर ग्राहक सध्या हात राखून खर्च करत असल्याचे यावरून स्पष्ट होते. भारतीय कंपन्याही याच जागतिक पाइपलाइनवर अवलंबून असल्याने, हा संपूर्ण क्षेत्रासाठी एक मोठा इशारा ठरला आहे, असे बजाज ब्रोकिंगचे शाश्वत सिंग म्हणाले. तर ॲक्सेंचरच्या या निर्णयामुळे अमेरिकन बाजारात सूचिबद्ध असलेल्या (एडीआर) प्रमुख भारतीय आयटी कंपन्यांच्या समभागांमध्येही मोठी विक्री सुरू झाली आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे व्ही. के. विजयकुमार यांनी व्यक्त केले.