Middle Class People In India: पोर्टफोलिओ व्यवस्थापक आणि गुंतवणूकदार श्याम शेखर यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारतातील मध्यमवर्गीयांची प्रगती, अडचणी आणि आर्थिक मानसिकता यावर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “मध्यमवर्गीयांची प्रगती थांबण्यामागे आर्थिक अडचणी नव्हे, तर मर्यादित मानसिकता कारणीभूत आहे. मध्यमवर्गातून बाहेर पडण्यासाठी काय करावं, याचा विचार करायलाही ते तयार नसतात.”
श्याम शेखर यांच्या मते, मध्यमवर्गीय मानसिकता म्हणजे अशी विचारसरणी आहे, जी स्वतःच्या महत्त्वाकांक्षेला खूप मर्यादित ठेवते. जसं की कार किंवा एसी घेण्याचं स्वप्न. मोठं आर्थिक बदल घडवण्याच्या कल्पनांपासून ते कायम दूर राहतात. “बऱ्याच जणांच्या क्षमतेचा विचार केला तर ही स्वप्नं देखील त्यांच्या योग्यतेसमोर नगण्य वाटतात,” असंही त्यांनी नमूद केलं.
फक्त कार आणि एसीचा विचार करण्याऐवजी, श्याम शेखर यांनी मध्यमवर्गीयांना चक्रवाढीच्या बाबतीत विचार करण्याचं आवाहन केलं. “मी १ कोटी रुपयांपर्यंत कमावणाऱ्या एका व्यक्तीला सांगितलं की तो प्रत्यक्षात २० कोटी रुपयांपर्यंतची मजल सहज गाठू शकतो,” असेही त्यांनी लिहिलं आहे.
या पोस्टमध्ये श्याम शेखर यांनी दीर्घकालीन आणि स्वयं-सक्षम अशी गुंतवणुकीची ‘फ्लायव्हील’ प्रणाली निर्माण करण्यावर भर दिला, जी काळानुसार सातत्याने संपत्ती निर्माण करत राहते.
त्यांनी इशारा दिला की, बहुतेक लोक कधीही अशी प्रणाली तयार करत नाहीत. त्याऐवजी ते इतरांकडून पर्याय शोधणे किंवा शॉर्टकटवर अवलंबून राहणे पसंत करतात. त्याहूनही वाईट म्हणजे, काही जण तर ही ‘अपयशी मानसिकता’ इतरांनाही देतात.
शेवटी श्याम शेखर म्हणाले की, या चक्रातून बाहेर पडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. ते म्हणाले, “मध्यमवर्गीय व्यक्तीने मध्यमवर्गीय मानसिकतेपासून मुक्त होण्यासाठी, पर्सनल फायनान्समधील मर्यादित विचारसरणीपासून स्वतःला मुक्त करण्यासाठी काय करावं लागेल, हे शिकणं गरजेचं आहे.”