मुंबईः राज्यात ऊर्जा, विमानचालन, शहर पुनर्विकास, विदा केंद्र आणि कोळसा गॅसिफिकेशन यांसारख्या विविध क्षेत्रांतील प्रकल्पांमध्ये अदानी समूहाने सहा लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे वचन दिले असून, त्यापैकी सुमारे २.६ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्णही झाले आहेत, असा अदानी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदानी यांनी गुरुवारी दावा केला.

जागतिक आर्थिक मंचाच्या (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) दावोस येथील बैठकीदरम्यान करण्यात आलेल्या गुंतवणुकीच्या घोषणा तसेच महाराष्ट्र सरकारशी झालेल्या भागीदारीच्या माध्यमातून समूहाने राज्यातील गुंतवणुकीचा आराखडा तयार केला, असे अदानी यांनी राज्याच्या ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ या गुंतवणूक प्रोत्साहन उपक्रमाप्रसंगी सांगितले.

राज्यातील समूहाच्या गुंतवणुकीमध्ये विमानतळ आणि ऊर्जा क्षेत्राला महत्त्वाचे स्थान आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन अदानी समूहाकडून केले जाते. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकासही समूहाकडून होत आहे. या विमानतळांची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता भविष्यात ९ कोटींपेक्षा अधिक होण्याची अपेक्षा आहे, असे अदानी यांनी सांगितले.

अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या माध्यमातून मुंबईतील ३० लाखांहून अधिक घरे आणि आस्थापनांना विजेचे वितरण केले जात आहे. यासाठी १,००० मेगावॉट क्षमतेची उच्च-दाब वीजवाहिनी विकसित करण्याचे कामही सुरू आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत बोलताना अदानी यांनी स्थानिकांचे स्थलांतर करण्यापूर्वी त्यांना आधुनिक घरे देणे, सूक्ष्म उद्योगांचे औपचारिकरण करून त्यांचे संरक्षण आणि धारावीचा एकात्मिक आर्थिक केंद्र म्हणून विकास करणे, यावर समूहाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी तसेच उद्योगांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नांचे अदानी यांनी कौतुक केले. सरकारच्या ‘वॉर रूम’ पद्धतीचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.