Adani Group One Lakh Crore Investment In Andhra Pradesh: अदाणी समूह पुढील १० वर्षांत आंध्र प्रदेशात तब्बल १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय त्यांनी राज्यातील प्रमुख क्षेत्रांमध्ये आधीच ४०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. शुक्रवारी विशाखापट्टणम येथे झालेल्या ३० व्या सीआयआय पार्टनरशिप समिट २०२५ च्या उद्घाटन सत्रात अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनचे व्यवस्थापकीय संचालक करण अदाणी यांनी ही घोषणा केली.

बोलत नाही, तर करून दाखवतो

“आंध्र प्रदेशावरील अदाणी समूहाचा हा विश्वास नवीन नाही. आम्ही फक्त गुंतवणुकीबद्दल बोलत नाही, तर ती करून दाखवतो. आतापर्यंत, आम्ही बंदरे, लॉजिस्टिक्स, सिमेंट, पायाभूत सुविधा आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात ४० हजार कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे. आम्ही इथेच थांबणार नाही. पुढील १० वर्षांत, आम्ही बंदरे, डेटा सेंटर, सिमेंट आणि ऊर्जा व्यवसायात अतिरिक्त १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहोत”, असे करण अदाणी यांनी सांगितले.

अदाणी समूहाने १ लाख कोटी रुपयांची बहु-क्षेत्रीय गुंतवणूक योजनेची रूपरेषा आखली आहे. ज्यामध्ये बंदरे, सिमेंट, डेटा सेंटर, ऊर्जा आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांचा समावेश आहे. करण अदाणी म्हणाले की, हा प्रयत्न आंध्र प्रदेशच्या विकासाच्या क्षमतेवर कंपनीचा दीर्घकालीन विश्वास दर्शवितो.

करण अदाणी यांनी त्यांच्या भाषणात प्रस्तावित विजाग टेक पार्कद्वारे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी १५ अब्ज डॉलर्सच्या प्रस्तावित प्रकल्पाचे देखील अनावरण केले. या प्रकल्पात गुगलच्या सहकार्याने जगातील सर्वात मोठे ग्रीन-पॉवर्ड हायपरस्केल डेटा-सेंटर विकसित करण्याचा समावेश आहे.

अदाणी समूहाच्या गुंतवणुकीमुळे १ लाख नोकऱ्या

त्यांनी पुढे सांगितले की, अदाणी समूहाने आंध्र प्रदेशात केलेल्या गुंतवणुकीमुळे आधीच एक लाखाहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. विविध क्षेत्रांमध्ये नियोजित नवीन प्रकल्पांमुळे, समूहाला येत्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल.

चंद्राबाबू नायडू खरे सीईओ

यावेळी करण अदाणी यांनी आंध्र प्रदेशच्या नेतृत्वाचे कौतुक केले. त्यांनी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांचे वर्णन “एक संस्था आणि आंध्र प्रदेशचे खरे सीईओ” असे केले.