नवी दिल्ली: देशातील पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) क्षेत्रातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेल्या अदानी समूहाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. ऊर्जा, बंदरे (पोर्ट्स) आणि वाहतूक क्षेत्रातील आक्रमक विस्तारामुळे समूहाचा एकूण महसूल आणि नफा आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. चालू आर्थिक वर्षात समूहाने ९४,८३४ कोटी रुपयांचा (१० अब्ज डॉलर) विक्रमी नफा कमावला असून, १.५३ लाख कोटी रुपयांची (१६.१ अब्ज डॉलर) भांडवली गुंतवणूक (Capex) केली आहे. एखाद्या भारतीय समूहाने एका वर्षात केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक ठरली आहे.
हिंडेनबर्गच्या वादळात १२ लाखांची झळ सोसलेल्या समूहाने सावरून घेतलेली ही झेप भारतीय उद्योग जगताचे लक्ष वेधून घेणारी आहे. अदानी समूहाने आर्थिक वर्षात केलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी जवळपास ८० टक्के हिस्सा हा ऊर्जा, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स यांसारख्या पायाभूत सुविधांवर खर्च केला आहे. या मोठ्या गुंतवणुकीमुळे समूहाची एकूण मालमत्ता आता ७.८५ लाख कोटी रुपयांवर (८२.८ अब्ज डॉलर) पोहोचली आहे.
समूहाने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षात अनेक मोठे प्रकल्प प्रत्यक्ष कार्यरत झाले आहेत, ज्यांचा फायदा पुढील आर्थिक वर्षात निदर्शनास येईल.
– नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सेवा कार्यान्वित
– गुजरातच्या खावडा येथे ५.१ गिगावॅट क्षमतेचा हरित ऊर्जा प्रकल्प आणि बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली कार्यान्वित
– देशातील महत्त्वाचा गंगा एक्सप्रेसवे प्रकल्प आणि तांबे गाळण्याचा कारखाना सुरू
नफ्यात ५.६ टक्क्यांची वाढ; बंदरे आघाडीवर
समूहाचा एकत्रित नफा वार्षिक तत्त्वावर ५.६ टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये अदानी पोर्ट्सच्या नेतृत्वाखालील वाहतूक विभागाने सर्वाधिक २३.२ टक्क्यांची वाढ नोंदवत २५,२२८ कोटी रुपयांचा नफा मिळवला. तर वीज आणि ऊर्जा निर्मिती व्यवसायाने ४.६ टक्क्यांच्या वाढीसह ४५,३७७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आर्थिक वर्ष २०२६ हा अदानी समूहासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या एका वर्षात केलेली गुंतवणूक ही सुरुवातीच्या २५ वर्षांत उभारलेल्या एकूण मालमत्तेच्या तोडीची आहे. हा भारताच्या विकासावरील वाढता विश्वास दर्शवतो, असे अदानी समूह व्यवस्थापनाने सांगितले.
कर्ज मर्यादेत, गुंतवणूकदारांना दिलासा
इतक्या मोठ्या प्रमाणावर नवीन गुंतवणूक करत असतानाही समूहाने कर्जाचे प्रमाण अत्यंत सुरक्षित पातळीवर ठेवले आहे. समूहाचे ‘नेट डेट-टू-इबिट्डा’ (Net Debt-to-EBITDA) प्रमाण ३.३ पट आहे. जे समूहाने निश्चित केलेल्या ३.५ पटांच्या मर्यादेपेक्षा कमी आहे. मार्चअखेर समूहाकडे ५५,८५२ कोटी रुपयांची रोकड उपलब्ध आहे, जी पुढील १७ महिने कर्ज फेडण्यासाठी पुरेशी आहे.
विशेष म्हणजे, पतमापन संस्थांकडून मिळालेल्या सुधारित मानांकनामुळे अदानी समूहाचा सरासरी व्याजदर (Borrowing Cost) ९ टक्क्यांवरून घसरून ७.८ टक्क्यांवर आला आहे. समूहाच्या सर्व कंपन्यांचे देशांतर्गत रेटिंग आता ‘ए-‘ किंवा त्याहून अधिक आहे. समूहाच्या मते, २०२५-२६ हे वर्ष अदानी समूहासाठी नव्या गुंतवणूक चक्राची सुरुवात ठरले. भारतातील पायाभूत सुविधांच्या वाढत्या गरजा, ऊर्जा संक्रमण आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील संधी यांचा लाभ घेत आगामी काळात दीर्घकालीन वाढ साध्य करण्यावर समूहाचा भर राहणार आहे.
