Adani Group Investment in Davos 2026 : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषद २०२६ मध्ये अदाणी समूहाने तब्बल ६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक ऊर्जा आणि डिजिटल क्षेत्रात असून भारतातील मॅन्युफॅक्चरिंग आणि क्लिन एनर्जी हबला दिशा मिळेल असा अदाणी समूहाचा दावा आहे, एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गुंतवणुकीमुळे नोकऱ्या निर्माण होणार

या सामंजस्य करारांमध्ये डेटा सेंटर्स, शहरी पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब युनिट्ससह विविध विकास क्षेत्रांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात एफडीआय येत आहे. ही गुंतवणूक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वापरली जाईल. यापूर्वी क्वचितच इतका मोठा एफडीआय करार झाला असेल. या गुंतवणुकीमुळे अनेक नोकऱ्या निर्माण होतील.”

अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) चे संचालक प्रणव अदाणी यांनी भारताच्या वाढत्या डिजिटल सामर्थ्यावर विश्वास व्यक्त केला आणि म्हणाले, “आज संपूर्ण जग डेटा सेंटरच्या क्षेत्रात भारताकडे पाहत आहे. जागतिक कंपन्या भारतात त्यांचा पाया मजबूत करण्यास खूप उत्सुक आहेत.”

या राज्यांमध्ये करणार गुंतवणूक

अदाणी समूहासाठी महाराष्ट्र हे प्रमुख गुंतवणूक केंद्र आहे. धारावी झोपडपट्टी पुनर्विकासासह अनेक प्रकल्प सुरू आहेत. तसंच, ईशान्य भारतातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी गुवाहाटी विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र म्हणून विकसित केले जात आहे. तसंच, पूर्व आणि ईशान्य भारतात सिमेंट उत्पादनाची क्षमता वाढवली जात आहे. आसाम आणि झारखंडसारख्या राज्यांत नवीन युनिट्स बांधली जात आहेत.

महाराष्ट्रासाठी आणखी कोणते करार झाले?

जागतिक आर्थिक परिषदेच्या वार्षिक बैठकीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह राज्य सरकारच्या विविध विभागांचे प्रतिनिधी मंडळ दावोस येथे उपस्थित आहेत. या परिषदेत पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रांतील उद्याोगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दर्शवणे सुरू केले असून पहिल्याच दिवशी विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीबाबतचे १९ करार करण्यास राज्य सरकारला यश आले. हरित ऊर्जा, अन्नप्रक्रिया, पोलादनिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, डाटा सेंटर, वाहन उद्याोग, विद्याुत वाहन, जहाजबांधणी अशा विविध क्षेत्रांतील ही गुंतवणूक मुंबईसह रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागांत होणार असल्याने तिथे उद्याोगवाढीसह मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. उद्याोग, गुंतवणूक आणि सेवा क्षेत्रांतील या गुंतवणुकीबाबत मुख्यमंत्री, उद्याोगमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रांतील उद्याोगांच्या प्रतिनिधींसमवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.