scorecardresearch

एअर इंडियानंतर आता अकासा घेणार उंच भरारी, हजारो हातांना देणार रोजगार

नवीन एअरलाइन्स Akasa Air देखील उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यांनी शेकडो नवीन विमानांची ऑर्डर देण्याबरोबरच कंपनी १,००० जणांची भरतीही करणार आहे.

akasa air
akasa air

सध्या भारतातील विमान वाहतूक क्षेत्रात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. एअर इंडियाच्या खासगीकरणानंतर टाटा समूहाने ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे, त्यामुळे तिथे हजारो लोकांची भरती करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. आता Akasa Air देखील मोठ्या प्रमाणावर विमानांची ऑर्डर देणार असून, १,००० लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. एकीकडे जेवरसारखे नवीन विमानतळ बांधले जात आहेत. दुसरीकडे जेट एअरवेज लवकरच पुन्हा परतणार असल्याचे सांगितले जात आहे आणि टाटा समूहाच्या नेतृत्वाखाली एअर इंडियानेही स्वतःला पुन्हा जागतिक एअरलाइन बनवण्याची योजना आखली आहे. नवीन एअरलाइन्स Akasa Air देखील उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यांनी शेकडो नवीन विमानांची ऑर्डर देण्याबरोबरच कंपनी १,००० जणांची भरतीही करणार आहे.

शेअर बाजारातील बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीची असलेल्या अकासा एअरने तिचे कामकाज वाढवण्याच्या योजनेवर प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी एकीकडे कंपनीचे विमान उड्डाण सेवेत सुधारणा करण्याचे नियोजन आहे, तर दुसरीकडे कंपनी आपली एकूण कर्मचारी संख्या ३,००० पर्यंत वाढवणार आहे.

१,१०० वैमानिक, विमान कर्मचारी असतील

Akasa Air चे CEO विनय दुबे यांनी एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कंपनी मार्च २०२४ पर्यंत १,००० लोकांची भरती करेल. तसेच कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या ३,००० च्या वर नेईल. यामध्ये देखील सुमारे १,१०० फक्त वैमानिक आणि विमान कर्मचारी असतील. विमान वाहतूक क्षेत्रात भरती नेहमीच मोठ्या प्रमाणात केली जाते, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.

लवकरच शेकडो विमानांची ऑर्डर देणार

केवळ ७ महिन्यांपूर्वी बाजारात दाखल झालेली अकासा एअर या वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा विचार करीत आहे. कंपनीने २०२३ च्या अखेरीस ३ अंकांत म्हणजेच १०० हून अधिक नवीन विमाने ऑर्डर करण्याची योजना आखली आहे. आकासा एअरने सध्या ७२ बोईंग ७३७ मॅक्स विमानांची ऑर्डर दिली आहे. यापैकी १९ विमाने आधीच ताफ्यात सामील झाली असून, एप्रिलमध्ये २० वे विमान मिळणार आहे. यामुळे कंपनी आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू करू शकणार आहे. ७२ विमानांसाठीची कंपनीची ऑर्डर २०२७ पर्यंत पूर्ण होईल. कंपनी पुढील आर्थिक वर्षात आपल्या ताफ्यात ९ विमानांची भर घालणार असून, तिच्या ताफ्यातील विमानांची संख्या २८ वर जाईल. सध्या कंपनी दररोज ११० उड्डाणे चालवते. उन्हाळी हंगामाच्या अखेरीस ती १५० उड्डाणे करण्यात येणार आहेत. आकासा एअरने देशांतर्गत बाजारात ३.६१ लाख कंपन्यांना आपली सेवा दिली आहे. दुसरीकडे वेळेबद्दल बोलायचे झाल्यास आकासा एअरची ८७ टक्के उड्डाणे वेळेवर पोहोचली आहेत.

एअर इंडिया ५,००० भरती करणार

दरम्यान, एअर इंडियाने २०२३ च्या अखेरीस ५,००० हून अधिक लोकांची भरती करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये सुमारे ४,२०० केबिन क्रू आणि सुमारे ९०० वैमानिकांची भरती केली जाणार आहे. सध्या एअर इंडियाकडे १६०० पायलट आहेत.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 17:36 IST

संबंधित बातम्या