2000 Rupee Notes Withdrawal Update: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा झाली त्या वेळी चलनात असलेल्या नोटांपैकी ९८.४१ टक्के नोटा बँकिंग प्रणालीमध्ये परत आल्या आहेत.
“१९ मे २०२३ रोजी २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य ३.५६ लाख कोटी रुपये होते, जे ३१ डिसेंबर २०२५ रोजी ५,६६९ कोटी रुपयांपर्यंत कमी झाले आहे”, असे आरबीआयने म्हटले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १९ मे २०२३ रोजी २,००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती. ताज्या आकडेवारीनुसार, त्या तारखेपर्यंत चलनात असलेल्या २ हजारांच्या नोटांपैकी ९८.४१ टक्के नोटा बँकिंग प्रणालीमध्ये परत आल्या आहेत.
आरबीआयने नमूद केले की, ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत देशभरातील सर्व बँक शाखांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची आणि बदलून घेण्याची सुविधा उपलब्ध होती. ९ ऑक्टोबर २०२३ पासून आरबीआयची १९ कार्यालये व्यक्ती आणि संस्थांकडून त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी २ हजार रुपयांच्या नोटा स्वीकारत आहेत.
याव्यतिरिक्त, सर्वसामान्य नागरिक देशातील कोणत्याही टपाल कार्यालयातून इंडिया पोस्टद्वारे २ हजार रुपयांच्या नोटा आरबीआयच्या कार्यालयांना पाठवून त्या आपल्या बँक खात्यात जमा करू शकतात, असे आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे.
