Agnivesh Agarwal Net Worth: वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश यांचे नुकतेच अमेरिकेत कार्डियाक अरेस्टने ४९ व्या वर्षी निधन झाले. न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई रुग्णालयात स्कीइंगच्या वेळी झालेल्या अपघातातून बरे होत असताना अग्निवेश यांचे निधन झाले.
एक्सवरील एका पोस्टमध्ये अनिल अग्रवाल यांनी याची माहिती दिली आहे. याचबरोबर हा आपल्या आयुष्यातील सर्वात दुःखद दिवस असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“ज्या पालकांना आपल्या मुलाला निरोप द्यावा लागतो, त्यांच्या दुःखाचे शब्दांत वर्णन करता येणार नाही. मुलाने वडिलांच्या आधी जगाचा निरोप घेणे अपेक्षित नसते. या धक्क्याने आम्ही पूर्णपणे हादरलो आहोत आणि आम्ही अजूनही यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत”, असे अनिल अग्रवाल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
या पोस्टमध्ये अनिल अग्रवाल यांनी शेवटी, ते त्यांची ७५ टक्के संपत्ती समाजकार्यासाठी दान करणार असल्याचेही म्हटले आहे.
अग्निवेश अग्रवाल कोण होते?
अग्निवेश अग्रवाल हे वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म ३ जून १९७६ रोजी बिहारमधील पाटणा येथे झाला होता. प्रिया अग्रवाल हेब्बर या अग्निवेश यांच्या भगिणी आहेत. प्रिया सध्या हिंदुस्तान झिंकच्या अध्यक्षा आणि वेदांताच्या गैर-कार्यकारी संचालक आहेत.
अग्निवेश यांनी अजमेरमधील प्रतिष्ठित मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते आणि नंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले होते. त्यानंतर त्यांनी वेदांता ग्रुपच्या कंपन्यांमध्ये काम केले. अग्निवेश अग्रवाल यांचा विवाह श्री सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक हरी मोहन बांगूर यांची कन्या पूजा बांगूर यांच्याशी झाला होता.
अग्निवेश यांनी वेदांताची उपकंपनी असलेल्या तलवंडी साबो पॉवर लिमिटेडच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. ते यूएईमधील मौल्यवान धातू शुद्धीकरण करणारी कंपनी फुजैराह गोल्ड एफझेडसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकही होते. त्यांनी ट्विन स्टार इंटरनॅशनल लिमिटेड आणि स्टरलाइट डिस्प्ले टेक्नॉलॉजीजसह समूहाच्या इतर उपकंपन्यांमध्ये संचालक म्हणूनही काम केले होते.
अग्निवेश अग्रवाल यांची एकूण संपत्ती किती होती?
अग्निवेश अग्रवाल यांची नेमकी एकूण संपत्ती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. मात्र, ते अग्रवाल कुटुंबातील आहेत, ज्यांच्याकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. त्यांचे वडील अनिल अग्रवाल यांची २०२५ च्या अखेरीस अंदाजे ३.६६ लाख कोटी रुपयांची संपत्ती होती असा अंदाज आहे. अग्निवेश यांनी प्रामुख्याने आरोग्यसेवा क्षेत्रात एंजल इन्व्हेस्टर म्हणूनही काम केले आहे.
