IMF Chief Kristalina Georgieva On AI Impact On Jobs: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) नोकऱ्यांवर परिणाम करत आहे. एआयमुळे नोकऱ्या निर्माणही होत आहेत आणि त्याचबरोबर कमीही होत आहेत. परंतु त्याचे व्यवस्थापन करणे अजूनही आपल्या हातात आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जिएव्हा म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, अमेरिकेत एआय नोकऱ्यांची मोठी मागणी आहे आणि त्या नोकऱ्यांना चांगल्या पगार देखील दिला जात आहे.
इंडिया टुडेशी बोलताना जॉर्जिएव्हा म्हणाल्या, “एआयचा नोकऱ्यांवर होणारा परिणाम खूप महत्त्वाचा असल्याचे पुरावे आधीच आपल्याला मिळाले आहेत. म्हणजे, एआय नोकऱ्यांवर येणारी त्सुनामी आहे.”
त्या म्हणाल्या की, आयएमएफच्या मूल्यांकनानुसार पुढील काही वर्षांत जगभरातील सुमारे ४० टक्के नोकऱ्या आणि प्रगत अर्थव्यवस्थांमधील ६० टक्के नोकऱ्यांवर एआयचा परिणाम होईल. त्या अधिक सक्षम होतील, अधिक उत्पादक बनतील किंवा काही ठिकाणी त्यांची जागा एआय घेईल.
“आधीच अमेरिकेत दर दहा नोकऱ्यांपैकी एक नोकरीसाठी एआय-संबंधित कौशल्यांची आवश्यकता आहे आणि अशा नोकऱ्यांमध्ये अधिक वेतन मिळते. अशा नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या हातात जास्त पैसा येतो, ते अधिक खर्च करतात आणि त्यामुळे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि मनोरंजन क्षेत्रातील कमी कौशल्ये असलेल्या कामगारांसाठी मागणी निर्माण होते. आम्ही अभ्यास केलेल्या क्षेत्रांमध्ये रोजगारावर एकूण परिणाम आश्चर्यकारकरित्या सकारात्मक आहे. मात्र, तो सकारात्मक परिणाम कमी वेतनाच्या नोकऱ्यांमध्ये झालेल्या वाढीमुळे आहे”, असे त्या म्हणाल्या.
याबद्दल सविस्तरपणे सांगताना आयएमएफ प्रमुख म्हणाल्या की, काही कर्मचाऱ्यांना चांगल्या कौशल्यांमुळे चांगले वेतन मिळत आहे, तर कमी कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना कमी वेतनाच्या नोकऱ्या मिळत आहेत. प्रत्यक्षात, ज्या नोकऱ्यांना फटका बसत आहे त्या मध्यमवर्गीय नोकऱ्या आहेत.
त्या म्हणाल्या की अलीकडे पदवीधर झालेल्या तरुणांमध्ये रोजगाराबाबत चिंता वाढत आहे. पण या प्रश्नावर धोरणकर्ते मदत करू शकतात. “आपण हतबल नाही आहोत. आपण सर्वप्रथम एआयच्या युगासाठी शिक्षणाची नव्याने व्याख्या करणे आवश्यक आहे. शिकत राहणे आणि नोकऱ्यांनुसार स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता विकसित करणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे, मजबूत सामाजिक सुरक्षा जाळे उभारणे आवश्यक आहे. जेणेकरून काही काळासाठी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तरी त्यांना स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आधार मिळू शकेल”, असे त्यांनी सांगितले.
