मुंबई : भारतीय शेअर बाजारासाठी २०२६ हे वर्ष आतापर्यंत अत्यंत निराशाजनक ठरले असून जागतिक बाजार भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन) क्रमवारीत भारताची आणखी घसरण झाली आहे. गेल्याच आठवड्यात तैवानने भारताला मागे टाकल्यानंतर, आता दक्षिण कोरियानेही मुसंडी मारत भारताला सातव्या स्थानावर ढकलले आहे. आशियाई बाजारातील या बदलत्या चित्रामुळे भारतीय गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
१ जूनपर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार, दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराचे एकूण बाजार भांडवल ५.०४ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. या तुलनेत भारताचे बाजार भांडवल ४.८४ ट्रिलियन डॉलरवर घसरले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात भारताला मागे टाकणारा तैवान ५.१५ ट्रिलियन डॉलरसह जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर कायम आहे, तर दक्षिण कोरिया सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
गेल्या आठवड्यात कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्रातील अभूतपूर्व तेजी आणि जगातील सर्वात मोठी चिपमेकर कंपनी ‘तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’मधील (टीएसएमसी) तुफानी घोडदौडीमुळे तैवानने एकूण बाजार भांडवलाच्या बाबतीत भारताला मागे टाकले आहे. ‘ब्लूमबर्ग’ने संकलित केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, तैवानच्या शेअर बाजार मूल्याने ४.९५ ट्रिलियन डॉलर (अंदाजे ४१५ लाख कोटी रुपये) टप्पा गाठला आहे, तर भारताचे बाजार मूल्य घसरून ४.९२ ट्रिलियनवर आले आहे.
या ऐतिहासिक भरारीमुळे अमेरिका, चीन, जपान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यानंतर भारतीय बाजार सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. अमेरिकेच्या बाजाराचे भांडवल ७७.५३ ट्रिलियन डॉलर आहे. त्यापाठोपाठ चीनचे १५.६१ ट्रिलियन डॉलर, जपानचे ८.७० ट्रिलियन डॉलर तर हाँगकाँगचे ७. २५ ट्रिलियन डॉलर इतके आहे.
‘एआय’ आणि सेमीकंडक्टरच्या जोरावर दक्षिण कोरिया-तैवानची ‘सुपरफास्ट’ घोडदौड
आशियातील या दोन दिग्गज बाजारांच्या अभूतपूर्व तेजीमागे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अर्धसंवाहकाच्या (सेमीकंडक्टर चिप्स) उद्योगातील जागतिक क्रांती हे मुख्य कारण आहे. दक्षिण कोरियाचा बेंचमार्क इंडेक्स ‘कोस्पी’ २०२६ मध्ये आतापर्यंत तब्बल ११० टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
तैवानच्या बाजाराने याच कालावधीत ६५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. जगभरातील ‘एआय’ डेटा सेंटर्ससाठी आवश्यक असणाऱ्या हाय-बँडविड्थ मेमरी आणि प्रगत चिप्सच्या निर्मितीमध्ये TSMC, Samsung Electronics आणि SK Hynix या कंपन्यांचा वरचष्मा आहे. या दोन्ही देशांच्या एकूण बाजार भांडवलात एकट्या सेमीकंडक्टर क्षेत्राचा वाटा जवळपास ६० टक्के इतका मोठा आहे. यामुळेच जागतिक ‘एआय’ मूल्य साखळीत (AI Value Chain) हे दोन्ही देश केंद्रस्थानी आले आहेत.
भारतीय बाजाराची ‘परतीची वाट’; चौफेर अडचणींचा वेढा
याउलट, भारतीय बाजारपेठ सध्या चौफेर संकटांचा सामना करत आहे. २०२६ मध्ये आतापर्यंत सेन्सेक्स सुमारे १२ टक्के आणि निफ्टी जवळपास १५ टक्क्यांनी घसरला आहे. वास्तविक पाहता, सप्टेंबर २०२४ च्या उत्तरार्धापासूनच भारतीय बाजारातील घसरण सुरू झाली होती. शेअरचे अवाजवी मूल्यांकन, कंपन्यांची सुस्तावलेली नफावृद्धी आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची अविरत सुरू असलेली चौफेर विक्री यामुळे बाजार पोखरला गेला आहे.
सध्याच्या घसरणीला प्रामुख्याने खालील घटक कारणीभूत ठरत आहेत
खनिज तेलाचा भडका: अमेरिका-इराण-इस्रायल संघर्षामुळे खनिज तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार गेले आहेत, ज्याचा थेट फटका भारताच्या व्यापारी तुटीला बसत आहे.
जागतिक व्यापारी युद्ध आणि महागाई
आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापारी तणाव आणि रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीमुळे देशांतर्गत महागाईचा दबाव वाढला आहे.
‘एआय’ शेअर्सचा अभाव
भारतीय बाजारात जागतिक स्तरावर टक्कर देऊ शकतील अशा मोठ्या ‘एआय’ किंवा हार्डवेअर-चिप निर्मिती करणाऱ्या सूचिबद्ध कंपन्यांची कमतरता आहे.
मान्सूनच्या चिंतेने पुढील वाटचाल खडतर
भारतीय बाजारासाठी आगामी काळ अधिक आव्हानात्मक असण्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे पश्चिम आशियातील युद्ध शमण्याची कोणतीही चिन्हे नसताना, दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) यंदा ९० टक्के (सरासरीपेक्षा कमी) मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची आणि अन्नधान्य महागाई वाढण्याची दाट शक्यता आहे.
खनिज तेलाच्या आणि कमॉडिटीच्या वाढत्या किमतींमुळे कंपन्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. ‘क्रिसिल’, ‘अँबिट कॅपिटल’ आणि ‘फ्रँकलिन टेम्पलटन इंडिया म्युच्युअल फंड’ यांनी आधीच जाहीर केले आहे की, कंपन्यांना ग्राहकांवर हा वाढीव खर्च लादणे कठीण जात आहे. परिणामी, चालू आर्थिक वर्षात कंपन्यांचा नफा आणि मार्जिनवर प्रचंड दबाव राहण्याची शक्यता असून, बाजाराला उभारी घेण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते. त्यामुळे अल्पकालीन काळात बाजारातील चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
