Ajay Devgn The Glen Journeys Whisky 4 Crore Turnover: अभिनेता अजय देवगण याच्या मालकीच्या प्रीमियम व्हिस्की ब्रँड ग्लेन जर्नीजने आपल्या व्यवसायात एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, ग्लेन जर्नीजची उलाढाल आता ४ कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.
कंपनीने एका निवेदनात जाहीर केले की, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच झाल्यापासून, म्हणजे अवघ्या चार महिन्यांत या प्रीमियम ब्रँडच्या ८,६२२ हून अधिक बाटल्यांची विक्री झाली आहे. हा ब्रँड आता निर्यातीद्वारे जागतिक विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहे.
‘द ग्लेन जर्नीज’च्या उत्पादकांनी एका निवेदनात सांगितले आहे की, अजय देवगण आणि कार्टेल ब्रॉस यांच्या या प्रीमियम सिंगल-माल्ट व्हिस्की ब्रँडने ४.१४ कोटी रुपयांची प्रभावी उलाढाल केली असून ८,६२२ हून अधिक बाटल्यांच्या विक्रीची नोंद केली आहे. हा ब्रँड भारतातील सहा राज्यांमधील ४३७ रिटेल आउटलेट्समध्ये उपलब्ध आहे.
या ब्रँडची ऑक्टोबर २०२५ मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा विक्री सुरू झाली होती. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये विस्तार करण्यात आला आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये हरियाणामध्ये याची विक्री सुरू झाली.
आता पंजाब, पाँडिचेरी, राजस्थान आणि चंदीगडसह अतिरिक्त २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीसाठी अर्ज करण्यात आले आहेत. ग्लेन जर्नीज आता मुंबई, लखनऊ, जयपूर, अहमदाबाद, त्रिवेंद्रम, अमृतसर आणि मंगळुरू या भारतातील प्रमुख विमानतळांवरील ड्युटी-फ्री (करमुक्त) विभागातही उपलब्ध आहे.
ब्रँडच्या प्रगतीबद्दल आपले विचार मांडताना अजय देवगण एका निवेदनात म्हणाला, “ग्लेन जर्नीजची मुळे स्कॉच परंपरा आणि व्यक्तिमत्त्वात रुजलेली आहेत. भारतीय ग्राहकांकडून मिळणारा उत्साहवर्धक प्रतिसाद खरोखरच समाधानकारक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवताना ब्रँडची सातत्याने वाढ होत असल्याचे पाहून आम्हाला आनंद होत आहे. वाढत्या मागणीसह, आम्ही भविष्यात मजबूत विक्रीबद्दल आशावादी आहोत.”
ग्लेन जर्नीज आता विस्ताराकडे लक्ष देत आहे. जून २०२६ मध्ये एका नवीन ‘स्मोकी व्हेरियंट’च्या लाँचसह हा ब्रँड आपला पोर्टफोलिओ अधिक विस्तारण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारतातील अधिक राज्यांमध्ये नोंदणीसाठी अर्ज करण्यासोबतच, हा ब्रँड परदेशी बाजारपेठांवरही लक्ष ठेवून आहे. ब्रँडला नुकतीच दुबईसाठी ९०० ‘कास्क सिरीज’ बाटल्यांची आणि १५० ‘२१-इयर-ओल्ड’ बाटल्यांची निर्यात ऑर्डर मिळाली आहे. तसेच, अमेरिका आणि कॅनडासाठीही विस्ताराच्या योजना आहेत.

