Ajay Nanavati Tata Offer Letter : माणूस कितीही श्रीमंत किंवा मोठ्या पदावर गेला तरी पहिली कमाई कधीही विसरत नाही. मग ती १ रुपया असो की १ लाख, प्रत्येकासाठी ती अनमोल असते. बँक ऑफ महाराष्ट्र आणि सिंडिकेट बँकेचे माजी अध्यक्ष अजय नानावटी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली आहे. १९७० च्या दशकात अमेरिकेतून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन मोठ्या आशेने नानावटी भारतात परतले. इथं कंपन्यांकडून आकर्षक पगाराच्या ऑफर्स मिळतील, असं नानावटी यांना वाटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात टाटा कंपनीचे पहिले नियुक्तीपत्र हातात आले तेव्हा त्यांना धक्काच बसला.
बॉम्बे हाऊसमधील ९६० रुपयांची नोकरी
अजय नानावटी यांनी शेअर केलेले नियुक्तीपत्र ४ जुलै १९७७ चे असून ते टाटा सन्स लिमिटेडची कंपनी ‘टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स’चे आहे. मुंबईतील ऐतिहासिक ‘बॉम्बे हाऊस’ मुख्यालयातून मिळालेल्या या पत्रात त्यांना ‘असिस्टंट कमर्शियल ऑफिसर’ म्हणून ऑफर करण्यात आली होती. ऑफर लेटरचा फोटो पोस्ट करुन नानावटी यांनी लिहिलंय, की “माझ्या वडिलांनी माझ्या अमेरिकेतील शिक्षणावर बक्कळ पैसे खर्चा केला होता. जेव्हा त्यांनी माझा ९६० रुपयांचा पहिला पगार पाहिला, तेव्हा शांतपणे निघून गेले. तेव्हा माझे वडील स्वतः एका बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापकीय संचालक (MD) होते. तरीही त्यांनी मला ही ऑफर स्वीकारण्याचा सल्ला दिला.”
करिअरमधील सर्वात योग्य निर्णय
नानावटी पुढे लिहितात, की माझ्याकडे टाटा कंपनीची एकमेव नोकरीची ऑफर नव्हती. उलट यापेक्षा जास्त पगाराचेही प्रस्ताव होते. पण, पगारापेक्षा मला ‘टाटा’ ब्रँड आणि बॉम्बे हाऊसमध्ये काम करणे महत्त्वाचे वाटले. ७ जुलै १९७७ रोजी त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. आज पाच दशकांनंतर मागे वळून पाहताना, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात बुद्धिमत्तापूर्ण करिअर निर्णय’, असे ते मानतात.

पगारापेक्षा क्षमतेच्या मागे जा
आजच्या तरुण पिढीला, विशेषतः इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कन्सल्टिंग किंवा प्रायव्हेट इक्विटी या क्षेत्रांत जाणाऱ्या उच्च शिक्षितांना सल्ला देताना नानावटी म्हणाले, “आजचे तरुण संधींकडे फक्त ‘पगाराच्या’ चष्म्यातून पाहतात. पण जशी तुमची क्षमता वाढते, तसा पगार आपोआप वाढतो.” तरुणांनी शॉर्ट-टर्म पगारवाढीपेक्षा आपल्या विषयात खोल ज्ञान मिळवावे. जिथे तुमच्या क्षमतांना वाव मिळेल अशा कंपनीत काम करण्याला प्राधान्य द्या, असे सल्लेही त्यांनी तरुणांना दिले आहेत.
