Ajinkya Rahane Net Worth : भारतीय क्रिकेट संघातील मराठमोळा खेळाडू आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. व्हिडीओच्या माध्यमातून भावनिक संदेश देत त्याने हा निर्णय घेतला. २०२०-२१ मधील ऐतिहासिक ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार आणि कसोटीत ५,००० हून अधिक धावांचा टप्पा पार करणारा खेळाडू अशी त्याची ओळख आहे. मात्र, क्रिकेटच्या मैदानासोबतच अजिंक्यने व्यावसायिक आणि आर्थिक क्षेत्रातही चांगली वाटचाल करत संतुलित आर्थिक ‘पोर्टफोलिओ’ तयार केला आहे.

अजिंक्य रहाणेची एकूण संपत्ती किती?

विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजिंक्य रहाणेची एकूण संपत्ती सुमारे ८० कोटी रुपये इतकी असल्याचा अंदाज आहे. बीसीसीआयचे वार्षिक मानधन, आयपीएलमधील पगार, ब्रँड एंडॉर्समेंट्स आणि विविध स्टार्ट-अप्समधील गुंतवणुकीतून त्याने हे साम्राज्य उभे केले आहे. २०२३ नंतर राहणे एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नसला तरी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट खेळणे सुरुच होते. आतापर्यंत केवळ आयपीएलच्या पगारातून त्याने ५४ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

स्टार्ट अप्स आणि व्यवसायात गुंतवणूक

भारताच्या माजी कर्णधाराने ‘मेराकिसान’ या ॲग्रीटेक प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे, जो किरकोळ आणि डिजिटल माध्यमांद्वारे शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि कृषी उत्पादने पुरवतो. तसेच त्याने ‘हडल’ या स्पोर्ट्स-टेक प्लॅटफॉर्ममध्येही गुंतवणूक केली आहे, जो क्रीडाप्रेमींना खेळाची टर्फ/वेन्यू बुक करण्याची सुविधा देतो. लहान मुलांच्या क्रिकेटवर आधारित ‘क्रिकेट पँग’ या ॲनिमेटेड मालिकेत त्याने गुंतवणूकदार आणि क्युरेटर म्हणून काम पाहिले आहे.

मुंबईतील ‘सी-फेसिंग’ आलिशान घर

रहाणेची रिअल इस्टेटमधील सर्वात मोठी आणि आकर्षक गुंतवणूक म्हणजे मुंबईतील त्याचा आलिशान सी-फेसिंग घर. वांद्रे-वरळी सी लिंक आणि अरबी समुद्राचा आकर्षक समुद्रकिनारा लाभलेल्या या घराची किंमत २० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रातील ग्रोथ पाहाता ही सर्वात मोठी गुंतवणूक मानली जाते.

लक्झरी कार कलेक्शन

गाड्यांची आवड असलेल्या रहाणेच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या आणि आलिशान गाड्यांचा समावेश आहे. अजिंक्यकडे २०२४ मध्ये खरेदी केलेली मर्सिडीज-मायबाख GLS 600 कार असून याची किंमत सुमारे ३ कोटी रुपये आहे. याव्यतिरिक्त ऑडी Q5, बीएमडब्ल्यू ६ सिरीज जीटी, रेंज रोव्हर आणि व्हॉल्व्हो एसयूव्ही ह्या कारदेखील तो वापरतो.

ब्रँड एंडॉर्समेंट्स

अजिंक्य रहाणेची शांत आणि संयमी प्रतिमा विविध ब्रँड्ससाठी नेहमीच आकर्षक ठरली आहे. अदिदास, सीएट, बुस्ट, हिरो मोटोकॉर्प, आयडीएफसी फर्स्ट बँक, माय११सर्कल आणि निओग्रोथ यांसारख्या प्रमुख ब्रँड्सची त्याने जाहिरात केली आहे. रिपोर्ट्सनुसार, तो एका ब्रँड एंडॉर्समेंटसाठी सुमारे १ कोटी रुपये शुल्क आकारतो.