Ajit Kumar Pocket FM Success Story : एखाद्या छोट्या संकटाने कोलमडून पडलेली अनेक माणसं तुम्ही पाहिली असतील. अशा निराश झालेल्या तरुणांनी अजित कुमार यांची गोष्टी नक्कीच वाचली पाहिजे. आधी आर्थिक परिस्थितीमुळे डॉक्टर होण्याचं स्वप्न धुळीस मिळालं. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या अजित कुमार या तरुणाच्या आयुष्याला एका अपघाताने नाट्यमय वळण दिलं. कधीकाळी २००-३०० रुपयांसाठी उन्हातान्हात सायकलवर फूड डिलिव्हरी करणारे अजित कुमार यांनी घरी बसून १ कोटी रुपयांची संपत्ती जमा केली आहे.
डॉक्टर होण्याचं स्वप्न अन् ७ लाखांचे कर्ज
अजित कुमार हा तरुण उत्तर प्रदेशातील रामपूरचा रहिवासी आहे. लहानपणापासून त्यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र, कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांच्या कुटुंबाची रोजीरोटी हिरावली गेली आणि त्यांच्यावर सुमारे ७ लाखांचे कर्ज झाले. कुटुंबाजी जबाबदारी आणि कर्जाचा डोंगर उतरवण्यासाठी अजित यांना आपले वैद्यकीय शिक्षण मधेच थांबवावे लागले. शिक्षण सुटल्यानंतर ते फरिदाबाद येथे आले आणि त्यांनी स्विगीमध्ये डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम सुरू केले. परिस्थिती गरीब असल्याने त्यांना सायकलवरच दररोज १०० किलोमीटर प्रवास करावा लागायचा. यातून कसाबसा घरखर्च भागवून कर्ज फेडण्याचा प्रयत्न सुरू होता.
एका अपघाताने बदलले संपूर्ण आयुष्य
आता आपलं आयुष्य सुरळीत होईल असं वाटत असतानाच अजित कुमार यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. ते कित्येक महिने अंथरुणाला खिळून राहिले. रोजगार बंद झाला आणि डोक्यावरील कर्जाचा डोंगर अजून वाढला. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी हार न मानता घरून करता येणाऱ्या कामांचा शोध सुरू केला. याच दरम्यान त्यांना पॉकेट एफएम वर लेखनाची संधी मिळाली. लेखनाचा कोणताही पूर्वअनुभव नसताना त्यांनी ही संधी स्वीकारली आणि हाच निर्णय त्यांच्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला.
२० हजारांच्या पहिल्या कमाईपासून ते करोडपती लेखकांपर्यंत…
अंथरुणावर खिळलेले असतानाच त्यांनी कथा लिहिण्यास सुरुवात केली. दिवसाला अनेक भाग लिहून त्यांनी ३ महिन्यांच्या आत पॉकेट एफएमच्या एका मोठ्या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले. त्यांची पहिल्या महिन्याची कमाई होती २०,००० रुपये. पगार खात्यात येताच त्यांनी ते पैसे आईकडे सुपूर्द केले. दुसऱ्याच महिन्यात ही कमाई दुप्पट होऊन ५२,००० रुपये झाली. त्यानंतर अजित कुमार यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांची आतापर्यंतची महिन्यातील सर्वाच्च कमाई तब्बल ६.२९ लाख रुपये इतकी आहे. त्याच्या कथेला १६.८ कोटींहून अधिक प्ले-काऊंट असून १ कोटींहून अधिक एकूण कमाई झाली आहे.
पॉकेट एफएमचा स्टार लेखक
आज अजित हे पॉकेट एफएमच्या ‘ब्रह्मायोधा: द डिस्ट्रॉयर’ या गाजलेल्या ऑडिओ सिरीजचे मुख्य लेखक आहेत. या मालिकेचे १,००० हून अधिक भाग प्रसारित झाले असून त्याला देशभरातून प्रचंड पसंती मिळाली आहे. या यशाच्या जोरावर त्यांना प्रतिष्ठित ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’मध्येही वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
