Amazon Layoffs 16000 Employees 2026 : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या ॲमेझॉनने पुन्हा एकदा तब्बल १६,००० कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली आहे. त्यामुळे मागच्या काही महिन्यांचा विचार केला तर अवघ्या काही महिन्यांतील कंपनीतील नोकर कपातीची ही दुसरी मोठी फेरी असल्याचं सांगितलं जात आहे.

ॲमेझॉनच्या या निर्णयामुळे त्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांमध्ये अनिश्चिततेची भावना निर्माण झाल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, ॲमेझॉन तब्बल १६ हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याच्या बातम्या दोन ते तीन दिवसांपासून माध्यमात आल्या होत्या. पण त्याबाबत कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या ताज्या फेरीवर अधिकृत प्रतिक्रया समोर आली नव्हती. मात्र, आता ॲमेझॉनने या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या नवीन फेरीची पुष्टी केल्याचं वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

वृत्तानुसार, ॲमेझॉनने या आठवड्यात कामावरून काढून टाकण्याच्या नवीन फेरीनुसार भारतासह जगभरात सुमारे १६,००० नोकऱ्यांची कपात करण्यात आली आहे. यातील बहुतेक कर्मचाऱ्यांची कपात ही अमेरिकेत करण्यात आली आहे. मात्र, तरी भारतातील बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद या सारख्या शहरांमधील शेकडो कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ॲमेझॉनने जगभरातील सुमारे १६,००० कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या घोषणेनंतर कंपनीने अधिकृत ईमेलच्या माध्यमातून प्रभावित कर्मचाऱ्यांना सूचित करण्यास सुरुवात केल्याचं वृत्तात म्हटलं आहे. ॲमेझॉन कर्मचाऱ्यांच्या इनबॉक्समध्ये सेव्हरन्स पॅकेजेस (कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिली जाणारी आर्थिक भरपाई) यासह आदी माहितीचे तपशीलवार ईमेल पाठवले जात आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत फक्त ॲमेझॉनच नाही तर अनेक ई-कॉमर्स कंपन्या आणि आयटी कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांची कपात केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे ई-कॉमर्स कंपन्या आणि दिग्गज आयटी कंपन्यात नेमकं काय चाललंय? एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून का काढून टाकलं जात आहे? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

नोकर कपातीची कपातीची अमेझॉनची अधिकृत घोषणा

ॲमेझॉनने २८ जानेवारी रोजी कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष बेथ गॅलेट्टी यांनी त्यांच्या ब्लॉग पोस्टद्वारे अधिकृतपणे कपातीची घोषणा केली. या घोषणेत कंपनीने अधिक कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या निर्णयाची पुष्टी करत म्हटलं की या निर्णयाचा परिणाम त्यांच्या जागतिक कर्मचार्‍यांमध्ये अंदाजे १६,००० पदांवर होईल. उपाध्यक्ष बेथ गॅलेट्टी यांनी म्हटलं की, “कर्मचारी कपातीचा हा टप्पा ॲमेझॉनमधील अंदाजे १६,००० पदांवर होईल.”