Mumbai To Nashik Shift Work Life Balance : ‘ॲमेझॉन’ सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीत ३५ लाखांचे पॅकेज, मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत अलिशान प्लॅट, ग्लॅमरस जीवनशैली.. कार्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही तरुणासाठी हे स्वप्नच आहे. मात्र, नाशिकमधील ३१ वर्षीय सान्या देशमुख या डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञाने मुंबईला कायमचा रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे सान्या आणि तिचा पती या दोघांचे एकत्रित मिळून ६० ते ६५ लाख रुपयांचे उत्पन्न सोडून त्यांनी नाशिकमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामागील कारण अनेकांचे डोळे उघडणारा आहे.
पुण्यातून इंजिनिअरींग ते ‘ॲमेझॉन’पर्यंतचा प्रवास
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, सान्या देशमुखने पुण्यातील एका नामवंत महाविद्यालयातून संगणक विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑफरची वाट न पाहता तिने सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात पाऊल ठेवले. तिचे कौशल्य पाहून टिकटॉकची मूळ कंपनी ‘बाईटडान्स’ने तिला नोकरी ऑफर केली. इथूनच तिच्या कार्पोरेट करिअरची सुरुवात झाली. मात्र, नंतर टॉकटॉक भारतात बॅन झाल्यानंतर तिने ‘इनमोबी’ आणि अखेर ‘ॲमेझॉन’ सारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये काम केले. ॲमेझॉनमध्ये तिचे वार्षिक पॅकेज ३० ते ३५ लाख रुपयांच्या घरात होते. तिचा पतीही तितकीच कमाई करत असल्याने दोघांचे एकत्रित उत्पन्न ६० ते ६५ लाख रुपये होते.
वर्क लाईफ बॅलन्स आणि महिन्याला ६५ हजारांचे भाडे!
पगार उत्तम असूनही मुंबईतील राहणीमान आणि वर्क कल्चरमुळे सान्याचे वर्क लाईफ बॅलन्स होत नव्हते. कोरोनाच्या काळात ती घरातूनच काम करत असल्याने काही प्रश्न नव्हता. कालांतराने कंपनीने ऑफिसमध्ये २ दिवस उपस्थिती अनिवार्य केली. नंतर ३ आणि शेवटी आठवड्यातून ५ दिवस ऑफिस अनिवार्य केल्यानंतर सान्याला छत्रपती संभाजीनगर (माहेर), नाशिक (सासर) आणि मुंबई अशी सतत धावपळ करावी लागत होती. रविवारी संध्याकाळी मुंबई गाठताना सोमवारचे काम तिच्या डोक्यात सुरू व्हायचे. प्रवास टाळण्यासाठी तिने ऑफिसजवळच १ बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला होता, ज्याचे भाडेच महिन्याला ६५,००० रुपये होते. एक दिवशी नवरा-बायकोने यावर चर्चा केली. “आम्ही काय कमावतोय, किती खर्च होतोय आणि हातात किती उरतेय, याचा विचार केला तेव्हा लक्षात आले की मुंबईत कुटुंब वाढवणे आणि मोठे घर घेणे आर्थिकदृष्ट्या खूप महाग पडणार आहे,” असे सान्याने सांगितले.
उत्पन्न घटले, पण ‘बचत’ अन् ‘गुंतवणूक’ वाढली!
सततची धावपळ, कुटुंबापासून दूर आणि भविष्यातील मुलांच्या दृष्टीकोनातून सान्या आणि तिच्या पतीने नाशिक स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. “कमी उत्पन्न असूनही आज आमची मासिक बचत मुंबईपेक्षा जास्त आहे. मुंबईत असताना मला पैशांचे योग्य नियोजन करता येत नव्हते. नाशिकमध्ये आल्यावर मी आर्थिक साक्षरता शिकले आणि एसआयपीद्वारे गुंतवणूक सुरू केली”, असं सान्या देशमुख सांगते.
मानसिक ताण गेला आणि आरोग्य अन् कौटुंबिक सुख मिळाले
कॉर्पोरेट क्षेत्रात असताना परफॉर्मन्स रिव्ह्यू, प्रोमोशनमधील विलंब आणि ले-ऑफच्या भीतीमुळे सान्या कायम मानसिक तणावात होती. अनेकदा ऑफिसच्या वॉशरुममध्ये जाऊन रडल्याचेही तिने प्रामाणिकपणे सांगितले. बाईटडान्सची नोकरी एका रात्रीत गेल्यानंतरही तिची अशीच अवस्था झाली होती. नाशिकमध्ये आल्यावर तिने स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू केली. आज तिच्या व्यवसायाला यश मिळत असून आयुष्यात समाधान असल्याचे ती आवर्जून सांगते.
स्वतःसोबत कुटुंबाला वेळ देता येतोय
सान्या सांगते, पूर्वी पैसा होता पण स्वतःसाठी वेळ नव्हती अशी परिस्थिती होती. आता पैसे आणि वेळ दोन्हीही मिळत आहे. नियमित जिम, पिकलबॉल खेळणे आणि दैनंदिन व्यायामामुळे तिचे पीसीओएस नियंत्रणात आल्याचे ती सांगते. सण-उत्सव, कौटुंबिक कार्यक्रम आणि पालकांसोबत वेळ घालवण्याचे स्वातंत्र्य मिळाले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामाचा ताण पूर्णपणे निघून गेला असून स्वतःच्या अटींवर काम करण्याची संधी मिळाली.
