Amazon H1B Visa Salary Range: ॲमेझॉन अमेरिकेतील आपल्या विदेशी कर्मचाऱ्यांना किती पगार देते हे एच-१बी व्हिसासंबंधीच्या सार्वजनिक माहितीमधून समोर आले आहे. ही माहिती कंपन्यांना एच-१बी व्हिसासाठी कुशल कामगारांना प्रायोजित करताना सादर करावी लागते. यात कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराची नोंद असल्याने ॲमेझॉनमधील विविध पदांसाठी कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो हे दिसते.

ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठ्या रोजगार देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे जगभरात १५ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. २०२५ च्या सुरुवातीपर्यंत ॲमेझॉनने अमेरिकेत सुमारे ११,३०० परदेशी कर्मचाऱ्यांसाठी एच-१बी व्हिसा अर्ज दाखल केले होते.

हे अर्ज सार्वजनिकरित्या उपलब्ध असल्यामुळे ॲमेझॉन विदेशी इंजिनिअर्स, अॅनालिस्ट, डेटा सायन्टिस्ट आणि प्रोडक्ट मॅनेजर्सना किती पगार देते हे स्पष्ट झाले आहे. यात मूळ पगाराचा समावेश आहे, परंतु स्टॉक बोनस, कामगिरीसाठी दिला जाणारा बोनस किंवा इतर फायदे, जे अनेक आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळतात त्यांचा समावेश नाही.

कोणत्या पदांसाठी किती पगार?

  • ॲमेझॉनमधील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनियर्सचा वार्षिक मूळ पगार २ कोटी १५ लाख ते २ कोटी २० लाख रुपये (२६३,७०० डॉलर्सपर्यंत) आहे.
  • ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर्सना सुमारे १ कोटी ५५ लाख ते १ कोटी ६० लाख रुपये (१८५,००० डॉलर्सपर्यंत) पगार मिळतो.
  • टेक्निकल प्रॉडक्ट मॅनेजर्सना सुमारे २ कोटी १० लाख ते २ कोटी १५ लाख रुपये (२३५,२०० डॉलर्सपर्यंत) पगार दिला जातो.
  • डेटा सायंटिस्ट्सचा मूळ पगार १ कोटी ९० लाख ते १ कोटी ९५ लाख रुपये (२३०,९०० डॉलर्सपर्यंत) आहे.

ॲमेझॉनचे पगार धोरण

ॲमेझॉनने म्हटले आहे की, त्यांच्या पगाराची रचना नोकरीची पातळी, विशिष्ट पद, कर्मचारी कुठे काम करतो आणि त्या कर्मचाऱ्याची मागील कामगिरी यासारख्या अनेक घटकांवर आधारित असते. या रचनेचा उद्देश स्पर्धात्मक आयटी बाजारपेठेत सर्वोत्तम प्रतिभेला आकर्षित करणे आणि टिकवून ठेवणे हा आहे.

हे पगाराचे आकडे अशा वेळी समोर आले आहेत, जेव्हा ॲमेझॉन आपल्या क्लाउड कॉम्प्युटिंगसह विविध विभागात मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करत आहे. जरी कंपनीने काही नोकऱ्या कमी केल्या असल्या तरी, दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार कुशल एच-१बी कर्मचाऱ्यांसाठी पगाराची पातळी उच्च आहे.