पीटीआय, नवी दिल्ली: गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर त्यांच्या खात्यातील म्युच्युअल फंड युनिट्स वारसदार किंवा नामनिर्देशित व्यक्तीच्या (नॉमिनी) नावावर हस्तांतरणाची प्रक्रिया ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ने (ॲम्फी) सुलभ केली आहे. मृत पावलेल्या व्यक्तीच्या पत्त्यातील बदल, नावातील किरकोळ चुका किंवा स्वाक्षरीमधील तफावत यांसारख्या तांत्रिक त्रुटींबाबतचे नियम शिथिल केले गेले असून, हे नवीन नियम शुक्रवारपासून तत्काळ प्रभावाने लागू झाले आहेत.
सुधारित मार्गदर्शक तत्त्वे ही सर्व सदस्य एएमसींना कळवण्यात आली आहेत आणि ती तात्काळ प्रभावाने लागू झाली आहेत, असे ‘ॲम्फी’ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कागदपत्रांमधील छोट्या-छोट्या चुका आणि विसंगतींमुळे मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना किंवा नॉमिनीला म्युच्युअल फंड हस्तांतरित करताना प्रचंड अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करणे आणि दुःखद प्रसंगात त्यांच्या कुटुंबाला दाव्यांची प्रक्रिया क्लिष्ट आणि मन:स्ताप देणारी ठरू नये, यासाठीच हा नियामक प्रयत्न असल्याचे ‘ॲम्फी’ने म्हटले आहे.
सुधारित ‘मानक कार्यपद्धती‘चा (एसओपी) मुख्य उद्देश हा गुंतवणूकदारांना त्रासदायक ठरणाऱ्या प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी कमी करणे हा आहे, जेणेकरून मृत गुंतवणूकदाराच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला युनिट्स आणि त्यावरील रक्कम विनासायास सहज मिळवता येईल, असे म्युच्युअल फंडाची शिखर संस्था असलेल्या ‘ॲम्फी’ने स्पष्ट केले आहे.
नोंदणीकृत पत्त्यामध्ये तफावत असल्यास, मृत युनिटधारकाच्या नवीनतम उपलब्ध पत्त्याची पुष्ठी करणारी संबंधित कागदपत्रे सादर केली गेल्यास हा व्यवहार पूर्ण करावा, असे सुधारित आराखड्याअंतर्गत, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना सल्ला देण्यात आला आहे.
