Amitabh Bachchan real estate investment Mumbai : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे अभिनयाव्यतिरिक्त खूप चांगले व्यावसायिक आहेत, हे अनेकांना माहिती नाही. विशेषकरुन रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांनी अधिक रस आहे. गेल्याच महिन्यात अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत शरयू नदी किनारी एक मोठा भूखंड खरेदी केला होता. या स्थावर मालमत्तांमधून बच्चन कुटुंब कोट्यवधी रुपयांची कमाई करते. नुकतेच अमिताभ यांनी एक मोठा भाडेकरार केला आहे. मुंबईतील अंधेरी वेस्ट (ओशिवरा) परिसरातील ‘सिग्नेचर’ इमारतीमधील तीन मजले त्यांनी ‘ट्रूनेटिव्ह एफ अँड बी प्रायव्हेट लिमिटेड’ या न्यूट्रिशन ब्रँडला भाडेतत्त्वावर दिले आहेत.
अमिताभ बच्चन यांना किती भाडे मिळणार?
झापकी (Zapkey) या रिअल इस्टेट प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, या जागेचे एकूण क्षेत्र तब्बल ८,४२८ स्क्वेअर फूट (कार्पेट एरिया) आहे. अमिताभ बच्चन यांना या जागेसाठी दरमहा ३३ लाख रुपये भाडे मिळणार आहे. हा भाडेकरार १५ ऑगस्ट २०२६ पासून लागू झाला असून तो पुढील ५ वर्षांसाठी (६० महिने) करण्यात आला आहे. ५ वर्षांच्या या करारातून बिगबींना एकूण २१.८८ कोटी रुपये भाडे मिळणार आहे. करारात दरवर्षी ५% भाडेवाढीची अट घालण्यात आली आहे. तसेच, कंपनीने १.९८ कोटी रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जमा केले आहेत. यासोबतच कंपनीला ९ कार पार्किंग स्लॉट्सचा वापर करण्याचा अधिकार मिळाला आहे.
रिअल इस्टेटमधील भक्कम गुंतवणूक
अमिताभ बच्चन यांचा हा पहिलाच भाडेकरार नाही. बच्चन यांची मुंबईसह देशातील इतर शहरांतही मोठी रिअल इस्टेट गुंतवणूक आहे. मुंबईत अनेक आलिशान बंगले आणि व्यावसायिक जागांशिवाय त्यांनी अयोध्येतही मोठी गुंतवणूक केली आहे. मार्च २०२६ मध्ये त्यांनी अयोध्येत ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ यांच्याकडून ३५ कोटी रुपयांना २.६७ एकर जमीन खरेदी केली होती.
मालमत्ता विक्रीतून ४७ टक्के नफा
अमिताभ बच्चन यांनी २०१२ साली मुंबईत खरेदी केलेले दोन आलिशान अपार्टमेंटची नोव्हेंबर २०२५ विक्री केली. हा रिअल इस्टेटचा व्यवहार या ज्येष्ठ अभिनेत्यासाठी फायदेशीर ठरला. CRE मॅट्रिक्सच्या अहवालानुसार, बिग बींनी या मालमत्तांच्या विक्रीतून तब्बल ४७ टक्के नफा मिळाला.
मुंबईतील या भागात रिअल इस्टेटचे दर गगनाला
अंधेरी वेस्ट आणि ओशिवरा परिसर हा मनोरंजन आणि व्यावसायिक उद्योगांचे प्रमुख केंद्र मानला जातो. या भागातील कमर्शियल प्रॉपर्टीजचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या या व्यवहारातून याचीच प्रचिती येते.
