scorecardresearch

अमूलचे दूध महागले, ‘या’ राज्यात दोन रुपयांनी भाव वाढले

राज्यातील दूध सहकारी संस्थांची मुख्य संस्था जीसीएमएमएफ बऱ्याचदा दुधाचे दर अगोदर जाहीर करते. मात्र तिने या प्रकरणावर पूर्णपणे मौन बाळगले होते. चारा आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने दुधाचा उत्पादन खर्च वाढला असून, त्याचा परिणाम आता दिसून येत आहे.

amul milk
(संग्रहित छायाचित्र)

अमूलने गुजरातमध्ये दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. शनिवारी गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) राज्यभरात दरवाढ जाहीर केली. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर दुधाच्या दरात झालेली ही पहिलीच वाढ आहे.

भाव वाढवण्याचे कारण काय?

राज्यातील दूध सहकारी संस्थांची मुख्य संस्था जीसीएमएमएफ बऱ्याचदा दुधाचे दर अगोदर जाहीर करते. मात्र तिने या प्रकरणावर पूर्णपणे मौन बाळगले होते. चारा आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने दुधाचा उत्पादन खर्च वाढला असून, त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. आता दरवाढीनंतर अमूलच्या म्हशीच्या दुधाचा दर आता ६८ रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर, अमूल गोल्डचा भाव ६४ रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर अमूल शक्तीचा दर वाढल्यानंतर प्रतिलिटर ५८ रुपयांवर पोहोचला आहे. अमूलच्या गायीच्या दुधाची किंमत आता ५४ रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. तर, अमूल ताजाची किंमत ५२ रुपये प्रति लीटर झाली आहे. दुसरीकडे अमूल टी-स्पेशलची किंमत ६० रुपये प्रति लिटर असेल.

गेल्या 6 महिन्यांत दोनदा वाढ

गेल्या सहा महिन्यांत देशभरात अमूलच्या दुधाच्या विविध ब्रँडच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली आहे. परंतु त्या वाढीतून गुजरात राज्याला वगळण्यात आले होते. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी अमूलने ऑक्टोबर २०२२ मध्ये प्रति लिटर २ रुपये आणि त्यानंतर गुजरात वगळता सर्व बाजारपेठांसाठी फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ केली होती. दुसरीकडे मदर डेअरीने गेल्या वर्षी चार वेळा दुधाच्या दरात वाढ केली होती. मदर डेअरी ही दिल्ली-NCR मधील शीर्ष दूध पुरवठादारांपैकी एक आहे, ज्याची विक्री दररोज ३० लाख लिटरपेक्षा जास्त आहे. अन्नधान्य महागाई आधीच उच्च पातळीवर असताना दुधाच्या दरवाढीमुळे घरगुती बजेटवर दबाव आला आहे. मदर डेअरीने दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून कच्च्या दुधाच्या खरेदीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे दरवाढ केली आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 15:50 IST

संबंधित बातम्या