टायर निर्माता कंपनी CEAT लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अनंत गोयंका यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांना कंपनीच्या उपाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. वर्ष २०१२ मध्ये अनंत गोयंका यांना CEAT कंपनीचे एमडी आणि सीईओ बनवण्यात आले. CEAT कंपनीने अनंत गोयंका यांच्या जागेवर अर्णब बॅनर्जी यांची CEAT चे नवे MD आणि CEO म्हणून २ वर्षांसाठी नियुक्ती केली असून, १ एप्रिल २०२३ पासून ते पदभार स्वीकारतील. अनंत गोयंका बोर्डाचे सदस्य म्हणून कायम राहतील, असेही CEAT लिमिटेडने नियामक फायलिंगमध्ये म्हटले आहे. त्यांच्या कार्यकाळात कंपनीने देदीप्यमान कामगिरी केली आहे. एका वर्षात CEAT चा शेअर्स ४० टक्क्यांनी वाढला. त्याच वेळी शेअर्सने तीन वर्षांत १०० टक्के परतावा दिला आहे. CEAT कंपनीच्या बोर्डाने १ एप्रिल २०२३ पासून कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून अनंत गोयंका यांची नियुक्ती केली असून, ते अकार्यकारी संचालक म्हणून काम पाहणार आहेत. अनंत गोयंका आता त्यांच्या पुढील वाटचालीत गट स्तरावर धोरणात्मक भूमिका निभावतील. गोयंका यांनी या वर्षाच्या सुरुवातीला एका मुलाखतीत सांगितले होते की, कंपनीच्या पॅसेंजर आणि ऑफ हायवे टायर (OHT) विभागांवर ते लक्ष केंद्रित करणार आहेत. याद्वारे कंपनीला नजीकच्या काळात २ बिलियन डॉलर कमाईचा टप्पा ओलांडायचा आहे. अनंत गोयंका यांच्याबद्दल… अनंत गोयंका हे आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांचे पुत्र आहेत. ३३,००० कोटी रुपयांच्या RPG समूहाचे वारसदार अनंत गोयंका यांनी १० वर्षांच्या कालावधीत कंपनीचे नेतृत्व केले, ज्यामध्ये कंपनीचे बाजार भांडवल ३७० कोटी रुपयांवरून ५८०० कोटी झाले. अनंत हे फिटनेस फ्रीक आहेत, त्यांना स्क्वॉश खेळायला आवडते. त्यांनी केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे. तसेच त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून अर्थशास्त्रात पदवीही संपादन केली आहे. CEAT च्या पूर्वी अनंत गोयंका हे केईसी इंटरनॅशनल कंपनीत कार्यरत होते. आरपीजी ग्रुपच्या वेबसाइटनुसार, त्यांनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, एक्सेंचर आणि मॉर्गन स्टॅनले यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्येही काम केले आहे. २०१३ मध्ये ते ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ATMA) चे अध्यक्ष देखील होते. २०१७ मध्ये फोर्ब्स मॅगझिनने 'नेक्स्ट जनरेशन बिझनेस लीडर ऑफ द इयर' म्हणूनही त्यांचा गौरव केला आहे.