Ananya Birla Assam Floods Relief Work : श्रीमंत लोकांना भावना नसतात, त्यांना केवळ पैसा दिसतो, अशी अनेकदा टीका केली जाते. मात्र, एका घटनेनंतर तुमचे मत बदलू शकतो. आसाममध्ये सध्या भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. लाखो लोक विस्तापित झाले असून शेकडो संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांची कन्या, उद्योजक व गायिका अनन्या बिर्ला यांनी स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन मदतकार्याची धुरा सांभाळली आहे. केवळ आर्थिक मदत देऊन न थांबता, अनन्या बिर्ला यांनी थेट चिखलात उतरून बाधित कुटुंबांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला आणि अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आसामसाठी महापुराचे थैमान

गेल्या काही दिवसांपासून आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये महापुराने थैमान घातले आहे. हजारो कुटुंबे बेघर झाली असून पुनर्वसनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशा कठीण प्रसंगी सामाजिक संवेदनशीलतेचे एक आदर्श उदाहरण अनन्या बिर्ला यांनी घालून दिले आहे. ‘अनन्या बिर्ला फाउंडेशन’च्या माध्यमातून स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने हे मदतकार्य राबवले जात आहे. अनन्या यांनी स्वतः पूरग्रस्तांना सुका मेवा, धान्य, पिण्याचे पाणी, औषधे आणि स्वच्छता साहित्य वितरित केले.

स्थानिकांना मानसिक आधार

अनन्य बिर्ला यांना हे सर्व मदतकार्य घरबसल्याही करता येणे शक्य होते. मात्र, त्यांनी स्वतः जमिनीवर उतरत स्थानिकांना मानसिक आधार देण्याचे काम केले. पूरग्रस्त भागातील चिमुकल्यांशी मनमोकळा संवाद साधला, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा प्रयत्न केला. “पूरग्रस्तांची हिंमत आणि जिद्द मला खूप काही शिकवून गेली. अशा संकटाच्या वेळी लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

आर्थिक मदतीपलीकडची ‘सामाजिक बांधिलकी’

कार्पोरेट जगतात किंवा अब्जाधीशांच्या कुटुंबात सहसा संकटाच्या वेळी निधी किंवा धनादेश देऊन मदत करण्याची पद्धत दिसून येते. मात्र, अनन्या बिर्ला यांनी ‘ग्राउंड रिॲलिटी’ समजून घेत स्वतः प्रत्यक्ष मदतीच्या मैदानात उतरणे पसंत केले.

अनन्य बिर्ला १७०० कोटींची मालकीन

अहवालानुसार, अनन्या बिर्ला यांची वैयक्तिक एकूण संपत्ती अंदाजे १,७७० कोटी आहे. बिर्ला कुटुंबाची एकत्रित संपत्ती २२ अब्ज डॉलर्स (अंदाजे १.८ लाख कोटी) पेक्षा जास्त असली तरी, अनन्याने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनन्या मुंबईतील मलबार हिल येथील जाटिया हाऊसमध्ये राहते. तिच्या वडिलांनी हा बंगला २०१५ मध्ये अंदाजे ४२५ कोटी रुपयांना खरेदी केला होता. ३०,००० चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या या घरात २० बेडरूम, हिरवीगार बाग आणि उत्कृष्ट बर्मी सागवान लाकडाचे काम आहे.