Anil Ambani : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने नुकतीच अनिल अंबानी यांच्या मुंबईतील घरावर मनी लाँडरिंग विरोधी कायद्याअंतर्गत जप्ती आणली. मुंबईतील या घराची किंमत ३ हजार ७१६ कोटींच्या जवळपास आहे. या प्रकरणात अनिल अंबानींची आज ईडी कार्यालयात चौकशी देखील झाली आहे.
दरम्यान, ईडीने कारवाई केल्यानंतर आता सीबीआयनेही अनिल अंबानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन विरोधात सीबीआयने आज आणखी एक गुन्हा दाखल केल्याची माहिती सीबीआयने एक्सवर एक निवेदन सादर करत दिली आहे.
सीबीआयने एक्सवर जारी केलेल्या निवेदनानुसार, शासकीय बँक व्यवहारांमध्ये तब्बल २ हजार २२० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता अनिल अंबानी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वृत्तानुसार, बँक ऑफ बडोदाच्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन्स विरुद्ध हा दुसरा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात सीबीआयने अनिल अंबानींच्या कार्यालय आणि निवासस्थानावर छापे टाकले असल्याचंही निवेदानात म्हटलं आहे.
अनिल अंबानींच्या मुंबईतील घरावर ईडीची जप्ती
अनिल अंबानी यांच्या मुंबईतील घरावर सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँडरिंग विरोधी कायद्याअंतर्गत जप्ती आणली आहे. मुंबईतील या घराची किंमत ३ हजार ७१६ कोटी आहे. अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) कडून झालेल्या कथित बँक फसवणुकीच्या चौकशीचा भाग म्हणून ही इमारत जप्त करण्याचा तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या पाली हिल परिसरात १७ मजल्यांची ही इमारत आहे.
दरम्यान, अंबानी यांना २६ फेब्रुवारी रोजी चौकशीत सामील होण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानुसार आज ईडीकडून त्यांची चौकशी झाली. याआधीही ऑगस्ट २०२५ मध्ये पहिल्यांदा त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (आरएचएफएल) आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल) यांनी उभारलेल्या सार्वजनिक निधीचा कथितपणे अपहार आणि गैरव्यवहाराशी संबंधित आहे. २०१७ ते २०१९ दरम्यान, येस बँकेने आरएचएफएल अपरिवर्तनीय रोख्यांमध्ये २,९६५ कोटी रुपये आणि आरसीएफएल अपरिवर्तनीय रोख्यांमध्ये २,०४५ कोटी रुपये गुंतवले. डिसेंबर २०१९ पर्यंत ही गुंतवणूक ‘अनुत्पादित’ (एनपीए) झाली. आरएचएफएलने थकविलेली रक्कम १३५३.५० कोटी रुपये आणि आरसीएफएलसाठी ती १९८४ कोटी रुपये आहे, असे ईडीने म्हटले आहे.

